'सापांचे संवर्धन व जनजागरण' या विषयावर स्वारातीम विद्यापीठामध्ये कार्यशाळा

नांदेड(प्रतिनिधी)एखाद्याला साप दिसला व त्याने इतरांना त्याचा ठावठिकाणा जर सांगितला तर काहींच विचार न करता प्रथम प्रतिक्रीया म्हणून आपण हातात मिळेल ती लाठी, काठी, गज, दगड घेऊन फक्त त्याला मारण्याच्या तयारीत सज्ज असतो. बरेचजण आपला काय संबंध म्हणून काढता पाय घेतात. थोड्या थोडक्याच जाणकार लोकांना सर्पमित्राला बोलावून त्याची सुटका व बचाव करण्याचे सुचते. अन्यथा जवळजवळ ९९ टक्के साप मारलेच जातात. साप विषारी आहे का बिनविषारी याची कोणतीच खातरजमा न करता ऐनकेन प्रकारे त्याला जीवानिशी मारणे हाच एकमेव हेतू ठेऊन माणसांचा सापाशी मुकाबला होताना दिसतो. आपल्या सभोवतालची अस्वच्छता व त्यात तयार होणारे उंदीर, किटक, बेडूक व इतर खाद्य सापांना सहज मिळणे व लपण्यासाठी मुबलक जागा मिळणे या मानव निर्मीत समस्यांमुळे सापांचे मानवी वस्तीत अतिक्रमण होते. सापांना मानवी अधिवास आवडत नाही, माणसांना साप भितात व शक्यतो माणसापासून दूरच राहतात पण मानवानेच सापांच्या अधिवासात प्रवेश केल्याने सापांच्या समस्या वाढलेल्या आढळून येतात व त्या अनुषंगाने मानवाला सर्पदंश होतो. दरवर्षी भारतात पन्नास हजार माणसे सर्पदंशाने मारतात. कोणताच साप माणसाच्या मागे लागून किंवा पाठलाग करून (जसे माणूस सापासाठी करतो) चावा घेत नाही, तर सर्पदंशाने होणारे मृत्यू हे अपघाताने, अनावधानाने, निष्काळजीपणाने मानवाने ओढवून घेतलेली अपत्तीच असते हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

जैवविविधतेच्या संवर्धनात जेवढे वाघाला आपण महत्त्व देतो तेवढेच सापांचेही महत्त्व आहे; कारण साप भक्षकही आहे व इतरांचे भक्षही आहे; मानवाचे जर या नाजूक अन्नसाखळीत हस्तक्षेप केला व साप मारले तर सापांचे मुख्य अन्न म्हणजे उंदीर, घुस, किटक, सरडे यांना नियंत्रणात ठेवणारा घटक नष्ठ होईल व त्यापासून मानवाला अधिकच तोटे होतील व एकंदरीत अन्नसाखळीच विस्कळीत होईल. त्याचप्रमाणे साप खाऊन जगणारे गरुड, घार, मुंगूस व इतर सस्तन प्राण्यांना अन्न मिळणार नाही. अशा दोन अन्न साखळ्यांना जोडणारा साप अत्यंत उपयोगी प्राणी आहे. सार्पदंशावर गुणकारी लस सुद्धा सापाच्या विषापासून तयार होते व मानवी जीवितहानी टळते त्यासाठी तरी साप वाचवणे गरजेचे आहे हे आपण विसरून चालणार नाही.

या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जैवशास्त्र संकुलातर्फे मंगळवार, दि. २१ मार्च रोजी 'सापांविषयीचे जनजागरण व संवर्धन' या विषयीच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयीचे माहिती पत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील व सर्व राज्यातील इच्छुक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी, संशोधन मार्गदर्शक यांच्यासाठी ही कार्यशाळा आहे. इच्छूकांनी या कार्यशाळेचे संयोजक प्रो. डॉ. एस. पी. चव्हाण (९४२१०४६३७२) यांच्याशी संपर्क साधावा. कार्यशाळेचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृह दि. २१ मार्च रोजी करण्यात आले आहे. सर्पदंश कसा टाळावा, सर्पदंश प्रथमोपचार व उपाचार, विषारी व बिनविषारी सर्पजाती याबाबत तज्ज्ञ प्राध्यापक, डॉक्टर, सर्पमित्र, सर्पसंवर्धनात काम करणारे स्वयंसेवक यांचे मार्गदर्शन, कृतीशिक्षण देण्यात येणार आहे. प्रा. डॉ. एल. एच. कांबळे हे या कार्यशाळेचे आयोजक आहेत.

Related Photos