शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यासाठी चंदासिंग कॉर्नर येथे रास्ता रोको

नवीन नांदेड(रमेश ठाकूर)भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात यावे यासाठी नांदेड हैद्राबाद रोडवरील चंदासिंग कॉर्नर येथे 19 मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी पाटील टर्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी रास्तारोको करणार्‍या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक व सुटका केली.

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षापासून सततचा दुष्काळ व पिक न आल्यामुळे व मालास योग्य तो भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. कर्जाचे ओझे सहन होत नसल्याने मुलीचे लग्न, घरातील वयोवृद्ध व्यक्तीचे आजारपण याच्या आर्थिक अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. शासनाकडे सतत कर्जमाफीची मागणी होत आहे परंतु मुख्यमंत्री कर्जमाफीबाबत वेळ मारुन नेत आहेत. शासनाने त्वरीत कर्जमाफी करावी यासाठी 19 मार्च रोजी नांदेड हैद्राबाद रोडवरील चंदासिंग कॉर्नर येथे सकाळी 11 वाजता रास्तारोको करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष आनंद पाटील जाधव, जिल्हाध्यक्ष गणेश सावंत, दगडुजी हंडे, केशव वानखेडे, धुमाळ सतिश, केशव जाधव, ज्ञानेश्र्वर जाधव, राहूल जाधव, संजय अटकोरे, मंगेश दासरे, ऋषीकेश कांबळे, गोविंद जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रामीणचे पो.नि.सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण नेहरकर व कर्मचार्‍यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी रास्तारोको करणार्‍या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना अटक करुन सुटका करण्यात आली. रास्तारोको मुळे जाणारी येणारी वाहतुक काही वेळासाठी विस्कळीत झाली.

Related Photos