Breaking news

अध्यक्षपद काँग्रेसकडे तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पदाची धुरा.. मंगळवारी सभा

नांदेड(अनिल मादसवार)नांदेड जिल्हा परिषदेच्या आगामी पाच वर्षासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाची आघाडी झाली असून, अध्यक्षपद काँग्रेसकडे तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पदाची धुरा सोपविली जाणार आहे. अन्य विभागातील पदे एकमताने घेण्यात येईल असा निर्णय झाला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोकराव चव्हाण व राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक आ.सतीश चव्हाण यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने पुन्हा काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे २८ सदस्य निवडून आल्याने प्रथम क्रमणकाचा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ३२ चा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणे गरजेचे होते. यासाठ किनवटचे आ.प्रदीप नाईक व लोहाचे माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांचे पूर्वीपासूनच सहकार्य होते. तसेच रासपाचा दशरथ लोहबंदे, आणि अपक्षच्या शोभा गोमारे यान सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेस आघाडीचा ३० सदस्यांचा एक गट तयार झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० सदस्यांचे पाठबळ मिळाले असून जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ३२ चा आकडा पार करून आजघडीला ४० सदस्य झाले आहे. यामुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार असून, ऐनवेळी काही सदस्य वाढण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. या निर्णयाने आता सेना - भाजपला सत्तेपासून दूर ठेवने सहज शक्य होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी आ.डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण, आ.प्रदीप नाईक, माजी खा.गंगाधरराव कुंटूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रोहिदास चव्हाण, श्याम दरक, राजेश कुंटूरकर, यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, रासपा व अपक्ष अशा ४0 जि.प.सदस्यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेषसभा
------------------------
नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवडीसाठी मंगळवार 21 मार्च 2017 रोजी दुपारी 2 वा. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात विशेषसभा बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाने केले आहे. या निवडसभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी काम पाहणार आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात निवडणूक विभागाने म्हटले आहे की, नांदेड जिल्‍हयातील सर्व नवनिर्वाचित जिल्‍हा परिषद सदस्‍यांना मंगळवार 21 मार्च 2017 रोजी होणा-या जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्या कळविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्‍हयातील सर्व नवनिर्वाचित सदस्यांना सूचित करण्‍यात येते जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवड प्रक्रियेसाठीची विशेषसभा मंगळवार 21 मार्च 2017 रोजी दु. 2.00 वा. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह येथे आयोजित केलेली आहे. या निवडीसाठी इच्छुकांना नामांकनपत्रे सकाळी दहा ते दुपारी बारा या कालावधीत पिठासीन अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. याविशेषसभेस उपस्थित राहतांना सर्व नवनिर्वाचित जिल्‍हा परिषद सदस्‍यांनी निवडून आल्‍याचे प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहनही करण्‍यात आले आहे.

Related Photos