Breaking news

बंडखोरीच्या प्रकाराने शिवसेना - काँग्रेसला नुकसानीची शक्यता

हिमायतनगर(अनिल मादसवार)निष्ठावंताना डावलून इतरांना उमेदवारी देण्याने काम प्रमुख पक्षात केले जात असल्याने कार्यकर्त्यानि काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय..? असा सवाल करत अनेक नाराज कार्यकर्ते पक्षाशी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. तर अनेकांनी उमेदवारीसाठी पक्षांतर केल्याचा फटकाही वरील राष्ट्रीय पक्षांना बसणार असल्याचे चित्र निवडणुकीच्या रणधुमाळीत पाहावयास मिळणार आहे.

गेल्या आठ दिवसापासून जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरु झाली असून, काँग्रेस पक्षाने प्रचारात व नामांकन दाखल करण्यात शुक्तिप्रदर्शनाने आघाडी घेतली असली तरी बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी शिवसेना पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आजघडीला हिमायतनगर तालुक्यात काँग्रेस पक्षाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे निश्चितच दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागांवर काँग्रेस आपला झेंडा फडकविणार असल्याच्या प्रतिक्रिया प्रमुख कार्यकर्ते देत असले तरी जनतेतून मात्र नाराजीचा समोर येत आहे. एव्हाना काहींनी आपले तिकीट कापल्या गेल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करून मिरिंडाचा झटका दिला आहे. तर शिवसेनेलाही त्या त्या भागातील पदाधिकाऱ्यांना न विचारता मनमानी पद्धतीने काहींना पक्षात सामील करून घेतल्यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते तथा पदाधिकारी अन्य पक्षाकडे वळण्याच्या तयारीत दिसत आहेत. याचा प्रत्यय पळसपूर येथील किशनराव वानखेडे यांच्या भाजप प्रवेशाने व सरसम परिसरातील सत्यव्रत ढोले यांच्या पुढाकारातून आदिवासी बचाव अंदोलन समितीच्या वतीने वसंत डवरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, स्थानिक काँग्रेस पक्षातील इच्छुक कार्यकर्ते आदिवासी बचाव आंदोलनाच्या हातात हात देण्याची तयारी करत असल्याचे सरसम जिल्हा परिषदेतील मतदारांत होत असलेल्या चर्चेवरून दिसून येत आहे. तसेच बरीचशी मंडळी शिवसेनेतून बाहेर पडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आपली ताकत दाखवून देण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे हि निवडणूक शिवसेनेला अक्षरशा धूळ चारावयाला लावणारी ठरणार काय..? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तसेच भाजपनेही तगडे व पट्टीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून, याचा फटका सुद्धा शिवसेनेला चांगलाच बसणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचेही उमेदवार रिंगणात असल्याने आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी बापूसाहेब गोरठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. सुरेशदादा गायकवाड यांच्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने यंदाची हि निवडणूक पंचरंगी ठरणार आहे. एकूणच सर्व परिस्थती व मतदारांचा कौल पाहता याचा फायदा मात्र कोणत्या पक्षाला हे अद्याप तरी सांगणे कठीण झाले. एकूणच काँग्रेस, सेना, भाजप, मध्ये बंडखोरीचे पेव फुटले असुन नाराज कार्यकर्त्याच्या हालचालीमुळे उमेदवारी मिळालेले मात्र चलबिचल झाल्याचे दिसत आहे. तरीदेखील पक्षस्रेष्टी उमेदवारी परत घेईपर्यंत काय खेळी करते आणि बंडखोरोपासून नाराजांना परावर्तित कशी करते यावर निवडणुकीचा डाव चालणार आहे. आजच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता स्वतःला कमी मानण्यास तयार नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असताना अनेक पुढार्यानी नात्या - गोत्याचे राजकारण करत आहेत. त्यामुळे सच्चा कार्यकर्ते वरिष्ठ नेते आजपर्यंत आमच्या कोपराला गुळ लावून ठेवल्याचे सांगत आहेत. ज्या पक्षासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून इमाने इतबारे काम केले परंतु त्याचे नेते आम्हाला संधी असताना जाणीवपूर्वक डावलून कानाखालच्या व ऐन वेळी घरोबा करणार्यांना उमेदवारी देऊन डावपेच खेळत आहेत. आमची नाराजी त्यांना चांगलीच भोवणार असून, त्यांच्या डावावर पलटवार करून आमची ताकत नक्कीच दाखवून देऊ असे खडे बोल बंडखोरीच्या तयारीत असलेले कार्यकर्ते उघडपणे बोलून दाखवीत आहेत.

Related Photos