Breaking news

अनेक पक्षांनी पक्षाची आचारसंहिता बाजूला ठेवून नवख्यांना दिली उमेदवारी

नांदेड(खास प्रतिनिधी)जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत आघाडी होण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या चर्चेची फेरी सुरू होती. तर सेना-भाजपाच्या युती संदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याने कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी न जाहीर करता वेळेवर जो उमेदवार मिळेल त्याला बी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

आजपर्यंतच्या इतिहासातील जिल्हा परिषदेची ही निवडणूक असेल की कोणत्याही पक्षाने म्हणजे प्रमुख कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांनी संभाव्य उमेदवारी अधिकृत यादी जाहीर न करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. जो वेळेवर प्रभावी आणि सक्षम उमेदवार भटेन त्यांना बी फॉर्म देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची वेळ आली असावी. विशेषत: कॉंग्रेस पक्ष सोडला तर इतर कोणत्याही पक्षाकडे 63 मतदारसंघात प्रभावी उमेदवार उपलब्ध नव्हते. ऐनउमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवाराला स्वत: च्या पक्षाने नाकारल्यानंतर त्या उमेदवारांनी इतर पक्षाशी संपर्क साधून बी फॉर्म मिळविला. यामध्ये सेना-भाजप हे पक्ष आघाडीवर होते. काही ठिकाणी शिवसेनेला सक्षम उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्याला पक्षात तात्काळ प्रवेश देऊन उमेदवारी दाखल करण्यासाठी बी फॉर्म दिला. पक्षाच्या आचारसंहितेला बाजूला ठेवून तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना अनेक ठिकाणी उमेदवारी देण्यात आल्याने निष्ठावंत कार्यकर्ते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. याचा दगा-फटका 23 फेब्रुवारी म्हणजेच निकालाच्या दिवशी दिसून येईन. निष्ठेने पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर डावलल्याने कार्यकर्ते नाराज झाले. तरी ऐनवेळी उमेदवारी देणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रचार ते करणार नाहीत, असेही चित्र दिसून येते.

जिल्हा परिषदेच्या 63 गटांत प्रत्येक पक्षाला सक्षम उमेदवार देत असताना जिल्हाध्यक्षांसह आमदारांची दमछाक झाली. ऐनवेळी कोणाला उमेदवारी द्यायची अन्‌ ऐनवेळी कोणाची उमेदवारी कापायची या संभ्रमावस्थेत पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना रहावे लागले. काही जणांनी तर पक्षाचा राजीनामा देणार असा दबावतंत्र टाकून उमेदवारी मिळवून घेतली. पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचे तिकीट देतो असा शब्द दिला असला तरी तडजोडीच्या राजकारणात दिलेल्या शब्दाला काही किंमतच राहिली नाही. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता पक्षात काम करीत असताना विचार करावा लागणार. कारण ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी मिळत असल्याने निष्ठावंत कार्यकर्ते यात कमालीचे नाराज झाले आहेत.

Related Photos