Breaking news

सरसम मतदार संघातील इच्छुकांना ना- लायक समजणाऱ्या काँग्रेस - सेनेला मतदार धडा शिकविण्याच्या तयारीत

हिमायतनगर(प्रतिनिधी)आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्थानिक इच्छुक उमेदवारावर अन्याय करत बाहेरच्या मतदार संघातील पार्सल उमेदवाराला उमेदवारी बहाल केली आहे. तर सरसम पंचायत समितीच्या सर्वसाधारण जागेवर ओबीसी प्रवर्गातील महिलेला उमेदवारी देऊन सदरील महिलेच्या पतिराजाचा बालहट्ट पुरविल्याने नाराज इच्छुक उमेदवार व मतदार काँग्रेस पक्षाला धडा शिकविण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळास धरू पाहणाऱ्या माजी आमदार माधवराव पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

सरसम जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून स्थानिक उमेदवार कानबा पोपलवार, डॉक्टर मनोज राऊत, राहुल लोणे, अरविंद गोखले, बळीराम राऊत, सोनबा राऊत यांच्या सौभाग्यवती इच्छुक होत्या. तर कामारी येथील जोगेंद्र नरवाडे व खडकी बा.येथील माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांच्या सौभाग्यवती सरसम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या., स्थानिक उमेदवारांनी दुसऱ्या मतदार संघातील उमेदवारास उमेदवारी बहाल करण्यास कडाडून विरोध करून स्थानिकच उमेदवार देण्याचा ग्रह धरला होता. त्यामुळे मतदारांनीही स्थानिकचा उमेदवार द्यावा असा आग्रह माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे सातत्याने धरला होता. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मतदार संघातीलच राहील असे ठोस आश्वासन या मतदार संघातील मतदारांना काँग्रेसच्या नेतृत्वाकडून देण्यात आले होते. परंतु शेवटच्या क्षणी घडलेल्या अतिवेगवान राजकीय घडामोडीने कामारी मतदार संघातील ज्योत्सना जोगेंद्र नरवाडे याना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यामुळे सरसम जिल्हा परिषद मतदार संघातील इच्छुक व त्यांचे समर्थक मतदार नाराज झाले.

तसेच पंचायत समितीच्या सर्व साधार जागेवर इच्छुक मराठा उमेदवारांना डावलून ओबीसी प्रवर्गातील सौ. माया दिलीप राठोड यांना उमेदवारी देण्यात आल्याने या जागेसाठी इच्छुक असलेल्याचाही हिरमोड झाला. त्यामुळे काँग्रेस पक्षावर नाराज झालेले इच्छुकांचे समर्थक व सर्व सामान्य मतदार काँग्रेसला धडा शिकविला जाईल असे टोळक्या - टोळक्याने चर्चा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षासाठी हि धोक्याची घंटा असल्याचे मानल्या जात आहे. तसाच प्रकार शिवसेनेतही घडला असून, स्थानिक सरसम येथील अष्टिकरांचे कट्टर समर्थक असलेल्या सौ.सुलोचनाबाई सुधाकर सूर्यवंशी ह्या सरसम पंचायत समिती गणासाठी इच्छुक होत्या. परंतु शिवसेनेत सत्तेच्या लालचेपोटी नव्याने दाखले झालेल्या सौ.ज्योती देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन निष्ठावंतावर अन्याय केला असल्याने गावातील नाराज गट शिवसेनेच्या उमेदवाराला पाणी पाजण्याची भाषा करत आहे. याच संधीचा फायदा घेऊन माजी खासदार सुभाष वानखेडे आपल्या जुन्या शिलेदारांना भेटून तथा नाराजांना राजी करून आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच शिवसेनेने निष्टवंत असलेल्या वसंत डवरे यांनाही उमेदवारी न देता डावलल्याने नाराज डवरे व माजी जिल्हा परिषद सदस्य रंगुबाई सत्यव्रत ढोले यांच्या पुढाकारातून सौ.सुलोचना वसंत डवरे यांची अपक्ष उमेदवारी आदिवासी बचाव समितीचा पिवळा झेंडा हातात घेऊन दाखल केली आहे. यामुळे ३ हजार ९४६ संख्या असलेल्या आदिवासी समाज बांधव शिवसेनेच्या उमेदवाराला हिरवे - पिवळे करण्याची भाषा करताना दिसून येत आहेत.

तर स्थानिक नाराज इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारीत असल्याने स्थानिक नेतृत्वाची नाराजी दूर करण्यासाठी कसोटी लागणार असल्याचे स्पस्ट चित्र सध्या तरी दिसून येत आहे. दरम्यान भाजपाची ताकत वाढविण्यासाठी कंबर कसलेले माजी खा.सुभाष वानखेडे सर्वच पक्षातील नाराज इच्छुकांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेत आहेत. या प्रकारामुळे सेना- काँग्रेसची ताकत कमी होऊन भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

Related Photos