Breaking news

सुजाण मतदार राजा कोणाचा करणार राजकीय अस्त...!

हिमायतनगर(प्रतिनिधी)दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीसाठी उद्या मतदान होणार असून, प्रचार थांबल्यानंतर उमेदवार आपले राजकीय भवितव्य उज्वल व्हावे यासाठी मतदारांच्या दारात जात आहे. दरम्यान केवळ मला एक मत द्या अशी विनवणी मतदारांना करून स्वतःसाठी एकमत मागितले जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे सुजाण मतदार राजा क्रॉस वोटींगचे अस्त्र वापरून कोणाचे भविष्य उज्वल करणार व कोणाचा राजकीय अस्त होणार हे दि. २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील सरसम आणि दुधड जिल्हा परिषद गट तर सरसम, सीरंजणी, दुधड, कामारी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून जोरदार प्रचार केला आहे. हि निवडणूक म्हणजे आगामी विधानसभेची जय्यत तयारी असल्याचे आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी साम, दाम, दंड, भेद या अस्त्राचा वापर करत शिवसेनेचे आ.नागेश पाटील व कॉंग्रेस पक्षाचे माजी आ.माधवराव पाटील यांनी प्रचारात आघाडी घेऊन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. तर भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी १५ वर्ष आमदार राहिलेले व ०५ वर्ष खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी सुद्धा विधानसभेची रंगीत तालीम असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आजारी असताना देखील उमेदवारांच्या प्रचार सभेत हजेरी लावून भाजपचे कमळ फुलविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, बविआ, या पक्षाच्या सर्व उमेदवारांनी सुद्धा कस पणाला लावून घरोघरी जाऊन पक्षाच्या योजनेची माहिती देऊन मते पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न करीत आहेत.

पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याची मान उंचावण्यासाठी आमचा उमेदवार निर्व्यसनी, जनतेच्या कामासाठी धावून जातो, कोणी बापाच्या पुण्याईवर तर काही जण खासदार, आमदार, याच्या विकास कामावर मत मागत आहेत. तर काही उमेदवार स्वताच्या कर्तृत्वावर तर जातीच्या आधारावर मत मागून आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान काही प्रमुख पक्षाचे उमेदवार मात्र फक्त मला एक फूली देऊन बटन दाबा, दुसर मत तुमच्या मनाने कोणालाही द्या असे म्हणत असल्याने यंदाच्या निवडणुकीत क्रॉसवोटींग होण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकारच्या मतदानामुळे कोणाचे भवितव्य उज्वल होईल आणि कोणाचा सत्यानाश होईल? याची उकल निकालानंतर होणार आहे. उद्या दि.१६ रोजी सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात होणार असून, आजची रात्र वैऱ्याची असल्याने आता प्रत्येक उमेदवार आपली इज्जत वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच कॉस मत मागून पक्षातिलच माणसे एकमेकाला खलास करण्याचा डाव खेळात असल्याने मतदार राजसुद्धा कोणाला मतदान करावे या विवंचनेत पडला आहे. जो कोणता उमेदवार पुढे येतो त्याला साहेब तुमच्याशिवाय दुसरा कोणालाच मत देणार नाही असा प्रतिडाव खेळत आश्वासन देत असल्याने निवडणुकीचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

मागील विधानसभा, नगरपालिका निवडणुकीचे चित्र, त्यावेळी दिलेले आश्वासने कितपत सत्यात उतरली, किती पूर्ण झाली, सध्याच्या सरकारमुळे शेतकरी, मजुरदारांचे कसे हाल होतात, शेतीमालाला भाव मिळत नाही, शासकीय कार्यालयात कामे होत नाहीत शासनाच्या मोफत आरोग्य, घरकुल योजनेसह अन्य सुविधांचा लाभ गरजून मिळत नाही, निराधारांची हेळसांड का होतेय. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, मात्र देशीदारूचा महापूर वाहतोय, महिला मुलींची छडेखानी होतेय, गरिबांवर अन्याय होत असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आणि अवैद्य धंदेवाल्याना अभय देऊन आपली तुंबडी कशी भरली जाते...? निवडणुकीत आश्वासन देणारा उमेदवार पाच वर्ष ढुंकूनही पाहत नाही, या सर्व बाबीचा विचार मतदार करत आहे. आणि जनतेच्या विकासाचा खरा कळवळा कोणत्या पक्षाच्या नेत्याला आहे. कोणी कामे केली, कोणी थापा मारल्या, याची पुरेपूर जाणीव ठेऊनच मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सुजाण मतदार बोलून दाखवित आहेत.

Related Photos