Breaking news

मा.ना. शरदचंद्रजी पवार राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जात आहेत काय

दि. 26 फेब्रुवारी 2017 रविवार रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रस्तुत विद्यापीठाचा 19 वा पदवीदान समारंभ संपन्न होत आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे स्वाभाविकपणेच महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी. विद्यासागर राव असणार आहेत. या समारंभात हजारो विद्यार्थ्यांना पदवी दिली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्षे सतत कार्यरत असलेल्या मा.ना. शरदचंद्रजी पवार यांना सन्माननीय डि.लिट. या पदवीने सन्मानित केले जात आहे. वास्तविक विद्यापीठाचा निर्णय होऊन बरेच दिवस उलटले पण पवार साहेबांना नांदेडला येण्यास वेळ मिळत नव्हता, त्यामुळे बारामतीला त्यांच्या घरी जाऊन पदवीदान करावे लागते की काय अशा प्रकारची चिंता संबंधितांना लागून होती, याची मला कल्पना आहे. सुदैवाने मा.ना. शरदचंद्रजी पवारांनी वेळ काढला आणि आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे. पवारांबद्दल प्रदीर्घ लेखन करण्यापूर्वी मी भारताचा सामान्य नागरिक या नात्याने मा. राज्यपाल महोदयांचे विशेष अभिनंदन करू इच्छितो, की त्यांनी तामीळनाडूचे राज्यपाल या नात्याने अलीकडेच एक नाजूक राजकीय प्रसंग मोठ्या धैर्याने हाताळला आणि मा. पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यांच्या धैर्याचे संपूर्ण राष्ट्राने कौतुक केलेले आहे.

मा.ना. शरदचंद्रजी पवार यांचे कार्य मी गेली 50 वर्षे एक तटस्थ निरीक्षक या नात्याने पहात आलो. सुदैवाने त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर पत्रव्यवहार करण्याची देखील मला अनेकवेळा संधी मिळाली. त्यांच्या स्वाक्षरीची अनेक पत्रे मला आलेली आहेत, याचा मला अभिमान वाटतो. माझ्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांनी पाठविलेले पत्र माझ्या मुलाने लॅमिनेशन करून जपून ठेवलेले आहे. माझ्यासारखेच पवार साहेबांनी लाखो लोकांशी व्यक्तिगत संबंध जोपासलेले आहेत. माझा नम्र अंदाज आहे, की आजवरच्या त्यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी किमान दोन कोटी लोकांशी व्यक्तिगत स्वरूपावर पत्रव्यवहार केला असेल. हा त्यांचा लोकसंग्रह अतिशय अद्वितीय आहे, असे मला वाटते. स्वाभाविकच भारतातील कानाकोपऱ्यातील लोक त्यांना पूर्ण नावानिशी ओळखतात.

मा.ना. शरदचंद्रजी पवार हे कदाचित आज असे एकमेव राजकीय व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्या सर्वच्या सर्व राजकीय पक्षांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर व्यक्तिगत ओळखी आहेत. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षांपासून प्रसार माध्यमातून अशी सतत चर्चा होत गेली, की मा.ना. शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रपती भवनाकडे कूच करीत आहेत काय ? त्यांचा एक सामान्य हितचिंतक या नात्याने मलाही गेली जवळजवळ तीन दशके असे वाटत आले, की ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जरूर होतील. आता त्यांचे 77 वे वर्षे चालू आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाची दगदगीची भूमिका त्यांना आता पेलने शक्य नाही, असे त्यांच्यासह इतरांनाही वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभेच्या ऐवजी राज्यसभेमध्ये जाणे पसंद केले आणि आज संपूर्ण भारतामध्ये अशी एक विशिष्ट राजकीय अवस्था आहे, की ज्यामुळे नशिबाने साथ दिली आणि मोदी साहेबांनी खरोखरच सकारात्मक प्रतिसाद दिला, तर पवार साहेबांना राष्ट्रपतीपद किंवा किमान उपराष्ट्रपतीपद तरी सहजासहजी मिळू शकते. आज केंद्रातले राजकीय गणित असे अवघड होऊ बसलेले आहे, की केवळ भाजपला स्वत:च्या बळावर राष्ट्रपतीपदी एखाद्या व्यक्तीला निवडून आणणे जवळजवळ अशक्य आहे. सध्या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत. त्यांचा निकाल 11 मार्चला हाती लागेल आणि चित्र स्पष्ट होईल. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या एका ज्येष्ठ नेत्याला या संबंधात बोललो तेव्हा ते म्हणाले, की 11 मार्चच्या निकालावर बरेचसे अवलंबून असणार आहे. हा निकाल कसा लागतो, याची संपूर्ण भारतातील जनता कमालीच्या उत्सुकतेने वाट पहात आहे.

गेली जवळजवळ अडीच वर्षे मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ज्या पद्धतीने मा.ना. शरदचंद्रजी पवार यांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना अलीकडेच अद्वितीय अशी पद्मविभूषण ही पदवीही देण्यात आलेली आहे. त्यावरून भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी कदाचित पवारांच्या नावाचा विचार सुरू केला असावा, असेच मला वाटते. प्रत्यक्ष भाजपमध्ये देखील राष्ट्रपतीपदासाठी पात्र अशा असंख्य नेत्यांची खूप मोठी यादी आहे. पण तरीही कदाचित विशिष्ट परिस्थितीमुळे आणि सर्व राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी सध्याच्या केंद्रिय नेतृत्वाला पवारांच्या नावाचा विचार करावा लागेल, असा माझ्या आंतरात्म्याचा आवाज आहे.

मा. यशवंतराव चव्हाण यांचे खरेखुरे मानसपूत्र असलेले मा.ना. शरदचंद्रजी पवार यांनी सर्वच क्षेत्रांना अद्वितीय स्पर्श करणारे कार्य चारवेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अनेक मंत्रीपदे भूषवित असताना महाराष्ट्रात आणि त्यानंतर केंद्रामध्ये संरक्षणमंत्री आणि प्रदीर्घकाळ शेतीमंत्री म्हणून जे कार्य केलेले आहे, त्याबद्दल केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच तज्ज्ञांनी योग्य नोंद घेतलेली आहे. त्यांच्या कार्याचे खरेखुरे मूल्यमापन करावयाचे तर मला किमान एक हजार पृष्ठांचा डीएससी स्तरावरील प्रबंधच लिहावा लागेल. परंतु वेळेच्या मर्यादेमुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळेही मी काही बाबी अत्यंत संक्षिपाने नोंदवित आहे. मला याचे स्मरण आहे, की 1994 मध्ये पस्तुत विद्यापीठाची स्थापना करण्यामध्ये पवार साहेबांनी अद्वितीय असा वाटा उचललेला आहे. या विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूंची निवडदेखील पवार साहेबांनीच केलेली होती. सुदैवाने मा. वाघमारे सरांची तीनवेळा विविध रेडिओ केंद्रांवरून मुलाखती घेण्याचे भाग्य मला लाभले. प्रस्तुत विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत मी सतत माझ्या अल्पस्वल्प क्षमतेप्रमाणे विद्यापीठाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पवारांनी 1994 मध्ये हे जे रोपटे लावलेले आहे, त्याचा आता जागतिक कीर्तीचा वटवृक्ष बनलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे किमान 15-20 परदेशांमध्ये प्रस्तुत विद्यापीठाचे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन जगभर अद्वितीय असेच कार्य करीत आहेत.

मला किल्लारी आणि सास्तुर परिसरातील भूकंपाची विशेष आठवण येते. या कठीण प्रसंगी पवारांनी ज्या तडफेने या परिसरामध्ये मदतकार्य पोचविण्याचे प्रयत्न केले, त्याला जागतिक स्तरावर नोंदले गेलेले आहे. पुण्याजवळील लवासा नावाच्या एका आदर्श शहराबद्दल आजही दुर्दैवाने कुणी खुलेपणाने प्रशंसा करताना मला दिसत नाही. वास्तविक पवार साहेबांनी इंग्लंडमधील लेक सिटी नावाच्या प्रकल्पाची महाराष्ट्रामध्ये आवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मा. अजित कुलाबचंद, मा. बा.शं. मुजुमदार इ. मान्यवरांनी गेली 25 वर्षे अहोरात्र परिश्रम करून ही किमान दहा लाख लोकांच्या निवासाची आणि पोटापाण्याची सोय केलेली आहे. या कार्याकडे केंद्रिय नेतृत्वाने सहानुभूमीने पहाणे आवश्यक आहे, असे मला वाटते आणि असे झाले तरच भारतामध्ये होऊ घातलेल्या शंभर आदर्श शहरांची निर्मिती त्वरेने आणि योग्यप्रकारे होऊ शकेल, असे मला वाटते.

मा.ना. शरदचंद्रजी पवार शेकडोवेळा नांदेडला आलेले आहेत. मला स्वत:ला दै. लोकपत्रचा उद्‌घाटन समारंभ आज आठवतो. तसेच भालेराव परिवाराने सिडकोच्या जवळ उभारलेल्या कॅन्सर केंद्राचे उद्‌घाटन करण्यासाठी देखील पवार साहेब जातीने उपस्थित होते. प्रस्तुत विद्यापीठाच्या अनेक कार्यक्रमांना ते जाणीवपूर्वक उपस्थित राहिलेले आहेत. या विद्यापीठाच्या विकासामध्ये त्यांचा अद्वितीय वाटा आहे, असेच मला वाटते. त्यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले आत्मकथन महिन्याभरात तीन आवृत्त्यांसह जनतेसमोर येते, यावरूनच ते आजही किती लोकप्रिय आहेत, हेच सिद्ध होते.
प्रस्तुत विद्यापीठाने मा.ना. शरदचंद्रजी पवार यांना सन्माननीय डी.लिट. देऊन एक चांगला संकेत दिलेला आहे, असे मला वाटते. हा एक शुभ शकून आहे, असे माझे अंतर्मन सांगते. येत्या 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती कार्यभार स्वीकारतील. हे भाग्य पवारांच्या नशिबी असावे, असेच माझ्यासारख्या कोट्यवधी भारतीयांना वाटत आहे. मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे केंद्रिय नेतृत्त्वाला काही अद्वितीय अचडणच निर्माण झाली तर त्यांनी मा.ना. शरदचंद्रजी पवार यांना किमान उपराष्ट्रपती पद देऊन या ऋषितुल्य समाजसेवकाचा खराखुरा गौरव करावा, असे मला वाटते.

मी आजवर विद्यापीठाच्या असंख्य कार्यक्रमांना केवळ कर्तव्य भावनेने उपस्थित रहात आलो. किमान आठ-दहा वेळा मी पदवीदान समारंभाच्या निमित्ताने स्थानिक वृत्तपत्रांमधून संपूर्ण पान किंवा दोन लेख लिहिलेले आहेत. सुदैवाने या विद्यापीठाने मला शिक्षणशास्त्र या विषयामध्ये गाईडशिप दिली आणि अल्पावधीत डॉक्टरेटचे सहा विद्यार्थी निर्माण करण्याचे जागतिक रेकॉर्ड मी करू शकलो. आजच्या समारंभाला उपस्थित राहण्याची माझी खूप इच्छा असतानाही केवळ कॅन्सर पेशंट असल्यामुळे आणि अस्वस्थता वाटू लागल्यामुळे मला धोका होईल अशी भीती वाटू लागल्यामुळे प्रस्तुत लेखनसाधना पूर्ण झाल्याबरोबर मी पुण्याला माझ्या मुलाकडे जात आहे. त्यामुळे संबंधित सर्वांची मी क्षमा मागू इच्छितो. वास्तविक दोन दिवसांपूर्वी मा. कुलगुरू महोदयांची नांदेड आकाशवाणीवरून मुलाखत घ्यावी, अशाप्रकारचा प्रयत्न मी केला होता. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी हतबल झालो आहे. त्यामुळे मा.ना. शरदचंद्रजी पवार साहेबांना माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे अभिष्टचिंतन करून आणि मा. राज्यपाल महोदयांचेही पुन्हा एकदा अभिनंदन करून मी ही अल्पस्वप्ल लेखनसेवा पूर्ण करीत आहे. अतिशय घाईने लिहिल्यामुळे स्वाभाविकपणे या लेखात काही चुका झाल्या असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मी संबंधितांची नम्रपणे क्षमा मागू इच्छितो आणि पुन्हा एकदा पवार साहेबांना शुभेच्छा देऊ इच्छितो.
लेखक : प्रा.डॉ. विलास कुमठेकर, घर नं. 1, ज्ञानेश्वरनगर, पूर्णा रोड, नांदेड-४३१६०५, मो-8652228202

Related Photos