राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी स्वारातीमचा संघ कोल्हापूरला रवाना

नांदेड(प्रतिनिधी)'शिवोत्सव-२०१७' अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सवाचे दि. १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात विद्यापीठाच्या संघास नक्कल, ऑन द स्पॉट पेंटिंग, शास्त्रीय तालवाद्य आणि शास्त्रीय स्वरवाद्य या कलाप्रकारात चांगली कामगिरी करून पारितोषिके प्राप्त झाल्यामुळे सदरील कलाप्रकारासाठी विद्यापीठाच्या संघाची निवड झाली आहे. यामध्ये प्रवीण राठोड, तेजेश धुमाळ, सुरेश चपेले, सौरभ कान्हेकर, विशाल सोमवंशी आणि अभिजित जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संघासोबत विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, संघव्यवस्थापक डॉ. शिवदत्त विभुते, प्रा. संदीप काळे, मार्गदर्शक सिद्धार्थ नागठाणकर, शिवराज शिंदे आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे कर्मचारी संभा कांबळे रवाना झाले आहेत.

संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि एन. सरोदे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. नागेश कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱयांनी शुभेच्छा दिल्या.

Related Photos