Breaking news

महाराष्ट्र पोलीस कमांडो संघाचे देदिप्यमान यश

मुंबई(प्रतिनिधी)जोधपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा-2016 या राष्ट्रीय स्तरावरील कमांडो स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस कमांडो संघाने देदिप्यमान यशाची पुनरावृत्ती करत स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी उत्कृष्ट संघभावना, नेतृत्व व सामरिक कौशल्याच्या जोरावर उपविजेते पदाच्या चषकावर पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव कोरले आहे.

दि.6 ते 11 फेब्रुवारी 2017 दरम्यान राजस्थान, जोधपूर येथील जोधपूर ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय कमांडो स्पर्धेत एनएसजी, 17 राज्य पोलीस संघ व 7 केंद्रिय पोलीस संघटना अशा एकूण 25 संघांमधील 750 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत राजस्थान पोलीस कमांडो संघास प्रथम क्रमांक, महाराष्ट्र पोलीस संघास द्वितीय क्रमांक तर एनएसजीने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

सदर स्पर्धेतील सहा स्पर्धा प्रकारांपैकी अनुक्रमे जंगल ऑपरेशन (STO-1) या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक, (STO-1 व STO-2 ) या प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक तर फायरींग व अर्बन ऑपरेशन्स (STO-2) या प्रकारामध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. फोर्स वन पथकाचे पोउनि. उत्कर्ष पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या 30 सदस्यीय महाराष्ट्र पोलीस कमांडो संघामध्ये 25 कमांडो फोर्स वन पथकाचे असून 3 मेन क्युआरटी, मुंबई शहर, 1 अहमदनगर पोलीस तर 1 रा.रा.पो.बल गट क्र.10 सोलापूर या घटकांमधील कमांडोचा सहभाग होता. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री.नरदेव सिंह, ऑन कॅप्टन (सेवानिवृत्त) व संघव्यवस्थापक म्हणून श्री.अकबर पठाण, अपर पोलीस अधिक्षक, यु.सी.टी.सी.,यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली.

या स्पर्धेचा सांगता समारोप शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जोधपूर येथे पार पडला. सदर सांगता समारंभास अध्यक्ष म्हणून राजस्थान राज्याचे गृहमंत्री श्री.गुलाबचंद कटारिया हजर होते. त्यांच्या हस्ते महाराष्ट्र संघास एकूणात द्वितीय क्रमांक चषक व जंगल स्मॉल टिम ऑपरेशन (STO-1) मधील प्रथम क्रमांक चषक या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कमांडो संघाचे या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. पोलीस महासंचालक म.रा., मुंबई श्री.सतीश माथूर, दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी व फोर्सवन पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुखविंदर सिंह यांनी अभिनंदन केले आहे.

Related Photos