सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावून देशात प्रथम राहण्याच्या मान

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत स्वारातीम विद्यापीठाच्या संघाची नेत्रदीपक कामगिरी
नांदेड(प्रतिनिधी)अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा या वर्षी वेस्ट बंगाल मधील मिदनापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ प्रथम क्रमांकावर आला आहे. आज दिनांक ६ मार्च रोजी या संघाने अंतिम फेरीत मुंबई संघाचा दोन गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

या संघामध्ये भागवत भुब्बे (कर्णधार), हर्षद हतानकर, सुरज शिंदे, उमेश सातपुते, अभिजीत पाटील, उमेश सावंत, बाळासाहेब पोकार्डे, सागर शिवाडकर, राहुल सोळुंके या खेळाडूंनी उत्कर्ष कामगिरी केली आहे. स्वारातीम विद्यापीठाच्या संघाने पंजाब येथील पुरुलिया विद्यापीठ, मैसूर विद्यापीठ,कालिकत विद्यापीठ आणि यजमान मिदनापूर येथील विद्यासागर विद्यापीठ या चार विद्यापीठाच्या संघाचा पराभव करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठाचा दोन गुणांनी पराभव करुन संघ देशात पहिला आला आहे.

या संघासोबत विद्यापीठ क्रीडासंचालक डॉ. मनोज रेड्डी, संघव्यवस्थापक प्रा. कमलाकर कदम, प्रशिक्षक प्रा. पवन पाटील, सहाय्यक प्रशिक्षक प्रा. रंजित जाधव यांनी वेळोवेळी संघाचा उत्साह वाढवून हे यश मिळवण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे. या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि नि. सरोदे, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Photos