आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात विद्यापीठाचे उत्कृष्ट सादरीकरण

नांदेड(प्रतिनिधी)दि. २८ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान इंदौर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालयमध्ये संपन्न झालेल्या १० व्या दक्षिण आशियाई आंतर विद्यापीठ आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या किरण देशमुख या विद्यार्थ्याने वक्तृत्व कलाप्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले.

त्यांनी "तकनीक लोगोंकी सृजनात्मकता कम कर रही है।" या विषयावर उत्कृष्ट मांडणी केली. श्रोत्यांनी प्रस्तुत मांडणीला उत्तम प्रतिसाद दिला. पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात दक्षिण आशियातील नऊ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रस्तुत युवक महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी देशातील स्पर्धकांना प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषिक न देता प्रभावी सादरीकरणाची संधी देऊन त्या त्या देशाचा सन्मान केला जातो. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात निवड होऊन सादरीकरणाची संधी मिळणे हे अत्यंत मानाचे समजले जाते. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये म्हैसूर विद्यापीठ, कर्नाटक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सवात किरण देशमुख या विद्यार्थ्याने वक्तृत्व कलाप्रकारात व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले होते. त्यामुळे त्यांची या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवासाठी निवड होऊन भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली .

कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. जी. बी. कतलाकुटे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, रा.से.यो. समन्वयक प्रा. नागेश कांबळे, व जनसंपर्क अधिकारी श्री. अशोक कदम व सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. संघाच्या यशस्वीतेसाठी संघव्यवस्थापक डॉ. शिवदत्त विभुते, वक्तृत्व कलाप्रकाराचे मार्गदर्शक डॉ. संदीप काळे तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे कर्मचारी श्री. संभा कांबळे, श्री. सुनिल कांबळे, श्री. बालाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Related Photos