logo

जमैका, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना भारताने आठ गडी राखून जिंकला आहे. विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर विंडीजचे २०६ धावांचे आव्हान भारताने ३७व्या षटकातच पार केले. या विजयासह भारतानं ही मालिका ३-१ अशा फरकानेखिशात घातली आहे. 

अँटिग्वा इथे झालेला चौथा सामना विंडीजने जिंकल्यामुळे मालिका विजयाचा फैसला आजच्या सामन्यात होणार होता. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २०६ धावा केल्या. भारताने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे विंडीजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विंडीजकडून शाई होप याने अर्धशतक झळकावले. त्याने  ५१ धावा केल्या. त्याच्या खालोखाल काइल होपने ४६, जेसन होल्डरने ३६ व रावमन पॉवेल याने ३१ धावा काढल्या. भारताकडून मोहम्मद शामीनं दहा षटकांत ४८ धावा देऊन ४ बळी घेतले. उमेश यादवनेही तीन मोहरे टिपले. तर, हार्दिक पंड्या व केदार जाधवनं प्रत्येकी एक बळी घेतला. टीम इंडियाने केवळ दोन गडी गमावून विंडीजचं २०६ धावांचं लक्ष्य केले. सलामीवीर शिखर धवन पहिल्याच षटकात अवघ्या ४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे व कर्णधार विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला. रहाणे ३९ धावांवर असताना बिशूच्या एका चेंडूवर पायचित झाला. रहाणे तंबूत परतल्यानंतर विराट व दिनेश कार्तिकने सर्व सूत्रे हाती घेत भारताचा विजय साकार केला. कोहलीने ११५ चेंडूत नाबाद १११ धावा केल्या तर, दिनेश कार्तिकने ५२ चेंडूत ५० धावा केल्या.

    Tags