logo

नांदेड, भोकर येथील वन परिमंडळ कार्यालयातील एका वर्ग तीनच्या कर्मचाऱ्याने एका शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यासाठी आवश्यक असलेला पंचनामा करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतली. त्या प्रकरणात भोकरचे विशेष न्यायाधीश एम.एस.शेख यांनी 4 वर्षे सक्त मजूरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. 

दि.27 फेबु्रवारी 2012 रोजी पवार कॉलनी भोकर येथील आंबेडकर चौक या रस्त्यावर असलेल्या एका चहाच्या टपरीवर वनपाल जेजेराव देवराम मुंडे या वर्ग तीनच्या कर्मचाऱ्याने उमरी येथील एका शेतातील सागवानाची झाडे कटाई करण्यासाठी आवश्यक असलेला पंचनामा तयार करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच सायंकाळी 5 वाजता स्विकारली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाअधिक्षक नईम हाशमी यांनी जेजेराव मुुंडे विरुध्द भोकर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 

या खटल्यात सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासले आणि  उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी वनपाल जेजेराव मुंडेला लाच घेतल्याप्रकरणी दोषी मानले आणि त्यास 4 वर्षे सक्त मजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. साईनाथ कस्तुरे यांनी बाजू मांडली. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरिक्षक संगीता पाटील आणि पोलीस कर्मचारी मिलिंद बोडके यांनी सहकार्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षा झालेल्या जेजेराव मुंडेची बातमी प्रसिध्दीस पाठवितांना जनतेला अहवान केले आहे की, कोणी सरकारी अधिकारी, कर्मचारी शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्याच्या लाच्या मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे, एसएमएस. व्हिडीओ, ऑडीओ असल्यास त्याची माहिती लाचलुचपप्रतिबंध विभागाला द्यावी. तसेच कुणी शासकीय अधिकारी आणि कर्मचारीने अपसंपदा जमा केली असल्याची माहिती जनतेला असेल तर ती माहितीसुध्दा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी असे आवाहन केले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064, कार्यालयाचा क्रमांक 02462-253512 आणि पोलीस उपअधिक्षक संजय कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक 8554852999 यावर सुध्दा माहिती देता येईल. 
 

    Tags