Breaking news

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची गोडी लावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे

उमरी(संजय मारावार)शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची गोडी लागावी यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. इयत्‍ता पाचवी ते आठव्या वर्गातील सर्व विद्यार्थ्‍यांना शिष्यवृती परिक्षेला बसवावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

उमरी पंचायत समिती येथे शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी खाते प्रमुख, केंद्र प्रमुख, अंगणवाडी व आरोग्य पर्यवेक्षिका, मिनी बिडीओ, विस्तार अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एल. रामोड, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कोंडेकर, महिला व बालकल्‍याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रविणकुमार घुले, पशु संवर्धन अधिकारी पवार आदींची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, उद्याचा सक्षम भारत घडवायचा असेल तर शालेय विद्यार्थ्यांवर गुणवत्तेसह योग्य संस्कार रूजविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांनी मनात आणले तर मोठे परिवर्तन घडू शकते. यासाठी सर्व शाळेत ज्ञानरचना वादाप्रमाणे मुलांना शिक्षण द्यावे. डिजिटल वर्ग खोली तयार करून आधुनिक पद्धतीने शिक्षण दिल्यास मुलांच्या बुध्दीमत्तेत निश्चितच वाढ होईल. शाळा सुधारणेसाठी लोकसहभाग घ्यावा. यावर्षी पाचवी व आठव्या वर्गातील मुलांचे शिष्यवृतीचे अर्ज भरावेत. तसेच जादा तासिका घेऊन सर्व विद्यार्थी पास होतील अशी तयारी शिक्षण विभागाने करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. यावेळी पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अभय नलावडे, शिरसाठ यांची उपस्थिती होती.

शौचालय बांधकामासाठी 15 डिसेंबर डेड लाईन
----------------------------
उमरी तालुक्यात चालू वर्षात 22 ग्रामपंचायती हागणदारीमुक्तीसाठी निवडण्यात आल्या असून सुमारे तीन हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्‍यात आले आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी केंद्र प्रमुख, मिनी बिडीओ व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना प्रत्येकी एक ग्रामपंचायत दत्‍तक देण्यात आली आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी 15 डिसेंबर 2016 ही अंतिम मुदत दिलेली आहे. यानुसार पंचायत समितीच्या वतीने नियोजन केले असल्याची माहिती गट विकास अधिकारी एन.एम.केंद्रे यांनी दिली आहे. शौचालय बांधकामाचा 15 डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी उमरी येथे येऊन आढावा घेणार आहेत.

Related Photos