उद्याच्या प्रगल्भ विचारवंतांसाठी विद्यार्थ्यांनी कलाशाखेकडे वळावे

उमरी(संजय मरावार)महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतासारख्या खंडप्राय देशाला प्रगल्भ विचारवंतांची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विज्ञान अणूबॉम्ब बनवेल पण याचा उपयोग कसा करावा हे फक्त सामाजिक शास्त्रच सांगू शकते. तंत्रज्ञान देदीप्यमान प्रगती करेल पण हे तंत्रज्ञान मानवी हितासाठी कसे उपयोगात आणावे हे सामाजिकशास्त्रे सांगू शकतात. दुर्दैवाने आजचे बहुसंख्य विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे वळत आहेत. आजचे लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन बुद्धिमान मुलांना कलाशाखेकडे वळण्यास प्रोत्साहन देते, म्हणून उद्याच्या प्रगल्भ विचारवंतांसाठी विद्यार्थ्यांनी कलाशाखेचा अभ्यास करावा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत व 4 थ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यख प्रा. शेषराव मोरे यांनी केले.

करकाळा ता. उमरी येथील लोकनेते बाबासाहेब देशमुख गोरठेकर साहित्यनगरीत ऍड. आर.एन. खांडील विचारपीठाच्या अकराव्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी, भगवानराव भिलवंडे, देवीदास फुलारी, शंकर वाडेवाले, स्वागताध्यक्ष मारूतीराव कवळे, प्रा. रविचंद्र हडसनकर यांची उपस्थिती होती. संमेलनाच्या रितसर उद्‌घाटनानंतर प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष श्री मारूतीराव कवळे गुरूजी म्हणाले, करकाळा नगरीत 11 व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनानिमित्ताने स्वागताध्यक्ष म्हणून अवघ्या सारस्वताचे सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले. यानंतर संयोजक दिगंबर कदम यांनी आपल्या मनोगतात तपपूर्तीकडे जाणाऱ्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या वाटचालीचे सिंहावलोकन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. माधवराव किन्हाळकर म्हणाले, संयोजक दिगंबर कदम यांच्या धडपडीचे मला नेहमीच कौतुक वाटते. सातत्याने अकरा संमेलने शासकीय मदतीशिवाय घेणे हे अवघड काम आहे. म्हणूनच आपण सर्वजणांनी हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी हातभार लावला पाहिजे, असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. कोत्तापल्ले यांनी खेडे स्मार्ट झाले पाहिजे ही भावना व्यक्त केली. लेखनाचा अंतिम हेतू सत्य हाच असावा त्यासाठी लोकसंवादसारख्या ग्रामऋण फेडणाऱ्या संमेलनाची आवश्यकता आहे, असे म्हणाले. विजय बंडेवार यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. उद्‌घाटन सोहळ्यानंतर नृत्यसम्राट गणेश वनसागरे यांनी लोककलेवर आधारित नृत्यपरंपरा सादर केली. यानंतर आधुनिक शेती, राजनीती व साहित्य या विषयावर उत्तमराव बाचेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. यात संतोष हंबर्डे, प्रा.डॉ. कमलाकर चव्हाण यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन पंडित पाटील तर आभार गोविंद पाटील यांनी मानले. प्रा. रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन सत्रात बालाजी पेठेकर, उत्तम मुधळ तालंग, प्रा.डॉ. शंकर विभूते यांनी आपल्या खुमासदार शैलीत कथा सादर करून रंगत आणली.

कविसंमेलन प्रसिद्ध कवी शंकर वाडेवाले यांच्या अध्यक्षतेखाली विरभद्र मिरेवाड व नंदा देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडले. यात जवळपास 50 कवींनी आपल्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. या शानदार संमेलनात ज्येष्ठ कवी प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी यांना लोकसंवाद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर गोविंद हंबर्डे, निर्मलकुमार सूर्यवंशी, अनिकेत कुलकणी, अनिल कसबे, सौ. सुचिता खल्लाळ, डॉ.सौ. रेखा चव्हाण, नागोराव येवतीकर, के.यू. सिरसीकर यांना लोकसंवाद पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलन यशस्वितेसाठी बापूराव कदम, गोविंद कदम, प्रा. नारायण शिंदे, महेश मोरे, ऍड. एल.जी. पुयड, नागोराव डोंगरे, आनंद कदम, शाहीर जन्टल, भीमराव आंबेवार आदींनी विशेष प्रयत्न केले. प्रारंभी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.

Related Photos