BREAKING NEWS

नांदेड जिल्हा परिषद त्रिशंकूच सेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येणार?

BY   Posted On : 22 Apr 2017 2442

नांदेड जिल्हा परिषदेत मतमोजणीनंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही राजकीय पक्षाला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्हा परिषद राजकीय बलाबल पहाता त्रिशंकु अवस्थेत आहे. असे असले तरी कॉंग्रेसने मात्र पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा झेडपीत सत्ता स्थापन करण्यामध्ये यश मिळेल का याची चाचपणी केली जात आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मिनल रामतिर्थ गटातून निवडून आल्या आहेत. तर मांजरम गटातून भाजपच्या तिकीटावर पूनम राजेश पवार या विजयी झाल्या आहेत. या दोन्ही लढतीकडे सबंध जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले होते. राजेश पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थ मानले जातात. सौ. पुनम यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार सौ. होटाळकर यांचा पराभव केला. सौ. पूनम यांचे नाव नांदेड आलूवडगाव आणि पुण्यातील भोसरी अशा तिन ठिकाणी आहे. होटाळकरांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले आहे. त्या बाबत निर्णय व्हावयाचा आहे. परंतु अटीतटीच्या निवडणुकीत मांजरमच्या मतदारांनी विजयाची माळ पूनम पवारांच्या गळ्यात टाकली. लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या सौ. प्रणीता देवरे-पाटील या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. चिखलीकरांची विवाहित कन्या व पूत्र प्रविण हे दोघेही निवडून आले आहेत. आपल्या विवाहित कन्येला झेडपीचे अध्यक्ष करता येईल का अशी मांडणी चिखलीकर करीत आहेत. तर दुसरीकडे नांदेडचे माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांची सून सौ. मधूमती राजेश कुंटूरकर कुंटूर गटातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी आहे. स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे धुरंधर आपापल्या पद्धतीने आडाखे बांधत आहेत. प्रणीता देवरे, डॉ. मिनल खतगावकर, मधूमती कुंटूरकर यांच्या प्रमाणेच कॉंग्रेसकडून चांडोळा गटाकडून निवडून आलेल्या सौ.सुशीलाबाई हणमंत पाटील बेटमोगरेकर या सुद्धा कॉंगे्रसकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत असे मानले जाते. बहुमताचा जादूई आकडा कोणाकडे झुकणार हे स्पष्ट झाल्यानंतरच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणाकडे जाईल या बाबत विश्‍लेषण करता येईल. जिल्ह्यात भाजपचे बळ वाढले

जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीत भाजपला बर्‍यापैकी यश मिळाले. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने चांगलीच बाजी मारली आहे. पाच वर्षापूर्वी भाजपच्या खात्यावर फक्त चार जागा होत्या. यावेळी मात्र त्यात घसघशीत वाढ होवून भाजपला १३ जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला पूर्वी २५ जागा होत्यात त्यात तीनने वाढ होऊन २८ जागा झाल्या आहेत. राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झाली आहे. पूर्वी १८ जागा होत्या आता फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेने मात्र पूर्वी प्रमाणेच १० जागी यश मिळवले आहे. एकजण रासपकडून निवडून आला आहे. त्या उमेदवाराला भाजपने पुरस्कृत केले होते. तर एकजण अपक्ष म्हणून निवडून आला आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे सर्वांचीच ओढाताण होणार आहे.

Tag:
Back to Top