BREAKING NEWS

भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत दिलजमाई

BY   Posted On : 22 Apr 2017 1537

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाचे मनोधैर्य उंचावले होते. पण भाजपाचे निर्भेळ यश हे धोक्याचेही ठरु शकते त्यामुळे भाजपाला पंचायत समितीच्या सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीत दिलजमाई झाल्याने भाजपा दहा वर्षानंतर सत्तेतून बाद झाली आहे. असे असले तरी राष्ट्रवादीची भाजपशी झालेली फारकत बदलत्या राजकिय समिकरणाचा भाग असल्याची चर्चा होत आहे.

नायगाव तालुक्याच्या निर्मितीनंतर पाच वर्षे भाजपाच्याच पाठींब्याने काँग्रेस पंचायत समितीत सत्तेत आली. मात्र भाजपासोबत मतभेद वाढले याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. भाजपासोबत घरोबा करुन मधुमती देशमुख या पाच वर्षे नायगाव पंचायत समितीच्या सभापती राहील्या. त्यांनी दोनवेळा सभापती पद मिळवतांना एकदा इतर मागासवर्गीयासाठी आरक्षित असलेल्या पदाचा लाभ घेतल तर दुस-यांदा सर्वाधारण प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा फायदाही घेतला.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाचे नरसी, मांजरम व टेंभूर्णी गणातून तीन उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसने कुष्णूर, बरबडा व मुगाव गणातून विजय मिळवला. दुसरीकडे कुंटूर गटाबरोबरच राष्ट्रवादीने देगाव व कोकलेगाव गणावर आपले स्थान अबाधित ठेवले. यामुळे पंचायत समितीत पुन्हा त्रीशंकू अवस्था आली. विशेष म्हणजे भाजपा आणि काँग्रेसकडे सभापती पदाचे दावेदार होते त्यामुळे यंदा भाजपा राष्ट्रवादीच्या पाठींब्याने पहीला सभापती बसवेल असे वाटत होते. व त्याद्रष्टीने जुळवाजूळवही काही भाजपाच्या पदाधिका-यांनी चालवली होती परंतु भाजपाच्या पाठींब्यावर पाच वर्षे सभापतीपदी राहीलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाला वेटींगवर ठेवले होते. याचे कारण होते जिल्हा परिषद.

नायगाव पंचायत समितीच्या सभापती असलेल्या मधुमती देशमुख यांनी कुंटूर गटातून विजयी झाल्या व काँग्रेसनेही जिल्ह्यात २८ जागा जिंकत पुन्हा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवणार याची जाणीव झाल्याने आणि काँग्रेस नेते राष्ट्रवादीशी तडजोड करणार हे निश्चित असल्याने कुंटूरकरांनी भाजपाशी फारकत घेतली असे बोलल्या जात असले तरी नायगाव तालुक्यात पुनम पवार व माणिक लोहगावे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे जे पाणीपत केले ते पाहता भाजपाचा वारु थांबवने शक्य नव्हते. आणि पंचायत समितीत भाजपाचा सभापती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचाच इशारा होता. भविष्यातील धोका ओळखून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले राजकिय मतभेद दुर ठेवत दिलजमाई केली त्यामुळे काँग्रेसचा सभापती तर राष्ट्रवादीचा उपसभापती झाला आहे. बदलत्या राजकिय समिकरणामुळे दिलजमाई झाली असली तरी ही दिलजमाई होण्यासाठी पडद्यामागे ब-याच राजकिय घडामोडी घडल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने दिलजमाईचा राजकिय शहाणपणा दाखवल्याने नायगाव पंचायत समितीवर जय हो चा नारा घुमला असला तरी शतप्रतिशत भाजपा म्हणणा-या मात्र दहा वर्षानंतर पंचायत समितीच्या सत्तेतून बाद व्हावे लागले आहे.

Tag:
Back to Top