BREAKING NEWS

शाब्बास नगरसेवकांनो शाब्बास .... जनतेने राडा करण्यासाठीच आपणास नगरसेवक केले आहे

BY   Posted On : 22 Apr 2017 619

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील काल दि. 1 एप्रिल 2017 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आपसात हाणामारीचा दार्शनिक देखावा करून आपले नाव वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जनतेसमोर आणले खरे पण ज्या जनतेने त्यांना ज्या कामांसाठी नगरसेवक केले ती कामे प्रत्यक्षात करून त्यांनी कधी तरी वर्तमान पत्रांना त्यांचे नाव सर्व कामांच्या सविस्तर लेख्याजोख्यासह छापण्यासाठी मजबूर व्हावे असे कृत्य केले तर जास्त चांगले होईल अशी भावना नांदेडच्या सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.1 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत आर्थिक मुद्दा अगोदर घ्यावा की पाणीपुरवठ्याचा मुद्या अगोदर घ्यावा यासाठी दोन नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली आणि दोघांनी तो प्रकार हाणामारीपर्यंत आणला. छायाचित्रकरांनी वर्तमान पत्रांना पाठविलेल्या छायाचित्रांमध्ये इतर नगरसेवक हसतमुखाने त्या दोघांच्या भांडणाला सोडविण्यासाठी अत्यंत आटोकाट प्रयत्न करत असल्याचे छायाचित्रांमध्य दिसत आहे. मग हा राड्याचा देखावा दार्शनिक म्हटल्यास काही चुक नाही असे आता जनता बोलायला लागली आहे. मुद्यांवर एकदुसऱ्याच्या विरोधात बोलणे आणि त्यावर आपले म्हणणे किती योग्य व जनतेच्या भल्यासाठी आहे हे दाखविण्यासाठी प्रयत्न करणे यात काहीच चुकीचे नाही. पण फक्त आपले, आपले नाव वर्तमानपत्रात यावे यासाठी तोप्रयत्न झाला तर त्याला कोणत्याच परिस्थितीत सुयोग्य म्हणता येणार नाही. जनतेने या सर्व नगरसेवकांना निवडून दिले आहे. हाच सर्वात मोठा त्यांच्या ओळखीचा पुरावा आहे. सर्वसामान्य जनतेने नगरसेवकांना आपल्या दैनिक गरजेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नगरसेवक म्हणून त्यांना त्या पदावर आरूढ केले. खरेच सर्व नगरसेवक जनतेच्या कामासाठीच निवडून आले आहेत काय ? ते ती कामे करतात काय ? आज एखाद्या दुचाकीवर फिरणारा युवक पाच वर्षात अत्यंत वातानुकुलीत चारचाकी वाहनात फिरताना दिसतो. वर्तमानपत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेकांची बोटे वाकडी झाली पण त्यांच्याकडे सायकलवरून दुचाकीसुद्धा आली नाही. असो तो आपल्या-आपल्या नशीबाचा भाग आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीचे वर्तन नगरसेवकानी 1 एप्रिल रोजी दाखविले ते नक्कीच प्रशसंनीय नाही.यापुढे तरी येणाऱ्या निवडणुकीत जनतेने सुद्धा आपल्या प्रभागात नगरसेवक या पदासाठी उमेदवार असणाऱ्या नगरसेवकांकडून आमची कामे केली नाहीत तरी चालेल पण तुम्ही आपसात भांडून स्वत: जखमी होणार याची शाश्वती घेतली तर ते जास्त योग्य होेईल असे आम्हाला वाटते. मराठी भाषेतील एक म्हण आहे, "ताकाला आली आणि मालकीण झाली' या पद्धतीने जे नगरसेवक कालपर्यंत जनतेसमोर उमेदवार होते तेच आता त्या जनतेचे मालक झाल्याप्रमाणे वागत आहे. जनतेसुद्धा एक टर्ममध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या नगरसेवकाला दुसऱ्यांदा निवडून दिले तर ठिक परंतु दोन पेक्षा जास्त संधी ज्याप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला नाही तसाच विचार नगरसेवकांना निवडताना जनतेने करावा लागेल कारण अमेरिकेच्या घटनेत कोणताही राष्ट्राध्यक्ष दोनदा निवडणुक लढविल्यानंतर तो तिसऱ्यांदा निवडणुक लढवूच शकत नाही. पण भारतात निवडणुकीत तशी कोणतीच नियमावली नसल्याने जनतेने स्वत:च हा नियम आपल्या मनात ठरवायला हवा आणि त्याप्रमाणेच मतदान करावे असा काळ आज तरी आलाच आहे. पदाधिकारी जसे तसे अधिकारी ------------------------ सेवानिवृत्तीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांना निलंबीत केल्याचे आदेश आल्यानंतर संघटनांनी त्याचा भरपूर निषेध केला. जिल्हा परिषदेतील काही पदाधिकाऱ्यांनी पण आपल्या नावाने त्या निषेधाचा बातम्या काढल्या. पद्माकर केंद्रे यांनी आपल्या नौकरीच्या कार्यकाळात काय-काय कामे केले, त्यात काय-काय चुका होत्या याच्या अनेक चौकशा झाल्या आहेत. या चौकशांमध्ये हाती धुपाटणेच आले. परंतु पद्माकर केंद्रे यांनी खरच काही वाईट केले नाही असे निषेध करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेसमोर सांगावे तर नक्कीच वाटेल की पद्माकर केंद्रे यांनी खरेच काही केले नाही. आता त्यांच्या सेवानिवृत्तीचा काळ झाला, आपल्या नौकरी कार्यकाळातील सर्व सेवा त्यांनी उपभोगल्या परंतु आज अधिकारी आणि इतर लोक त्यांच्या निलंबनाचा निषेध करत असतील तर ते सर्वसामान्य जनतेच्या मुळ कामांना पुन्हा एकदा फाटाच देत आहेत. या जिल्हा परिषदेतील एक अधिकारी उत्तम कोमावाड यांनी जिल्हा परिषदेतून एका बियांच्या गुंतवणुक करून जिल्हा परिषदेला जवळपास 75 लाखांना गंडा घातला. हा पैसा कोणाचा आहे. हा सर्व पैसा सर्वसामान्य नागरिकांचा आहे. नागरिकांचा पैसा एखाद्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने उडवला असेल तर त्याच्याविरूद्ध काहीच बोलायचे नाही का, त्यांच्याविरूद्ध काहीच कारवाई होऊ नये का मग लोकसेवक या व्याख्येत बसणारे हे अधिकारी लोकांची सेवा करत आहेत की लोकांना त्यांच्या पोटातील अन्न काढून स्वत: खात आहेत हा एक विद्यावाचस्पती मिळविणारा विषय होईल. एकूणच पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या या आपल्या भाकरीवर तूप ओढण्याच्या चढाओढीत फासीवर चढतो तो सर्वसामान्य नागरिक, खरे तर भारताच्या संविधानात भारताचा सर्वसामान्य नागरिकच केंद्रबिंदू मानला जातो. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या निवडणुकीत भुमिका मांडताना सर्वसामान्य नागरिकच आमचे लक्ष असल्याचे सांगतात. पण भारताच्या 67 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर आजही भारताचा सर्वसामान्य नागरिक एक गर्द खाईमध्ये पडलेला आहे. त्या बिचाऱ्याची आठवण कोणाला येत नाही, त्यांचे भले करण्यासाठी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी जन्मावें लागतील तरच काही आशा करता येईल.


Tag:
Back to Top