BREAKING NEWS

शेतकऱ्याने एक नजर पिकावर आणि दुसरी दिल्लीतील धेारणावर ठेवली पाहिजे

कुंटूर येथे विजय जावंधिया यांचे प्रतिपादन

BY   Posted On : 22 Apr 2017 106

उत्तम शेती ही कनिष्ठ झाली ती शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी नेहमी लहरी निसर्गाशी, शासकीय यंत्रणांशी आणि बाजारपेठांशी लढत असतो. त्याच्या शेतीमालाला योग्य तो भाव मिळत नाही याला जबाबदारही शासनाची चुकीची धोरणं आहेत. तेव्हा शेतकऱ्याने आता आपली एक नजर आपल्या पिकावर तर दुसरी नजर दिल्लीत ठरणाऱ्या धोरणांवर ठेवली पाहिजे. शासन जर चुकीचे धोरण अवलंबित असेल तर त्याविरूद्ध संघटितपणे आवाज उठविला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते तथा विचारवंत विजय जावंधिया यांनी केले.

ते कुंटूर येथे पू. साने गुरूजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पू. साने गुरूजी प्रबोधन व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धाच्या निसर्गसेवा समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर बेलखोडे हे तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवकचे प्रदेशा उपाध्यक्ष राजेश देशमुख कुंटूरकर व प्राचार्य डॉ. सुरेश सावंत उपस्थित होते. शिवाय सूर्याजी पा. चाडकर, बाबुराव पा. आडकिने, बालाजीराव पवार, सरपंच रूपेश कुंटूरकर यांचीही उपस्थिती होती.

या कार्यक्रमात वाचनालयाचे पुरस्कारही वितरीत करण्यात आले. कै.शंकरराव केरबा पाटील कदम यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा राज्यस्तरावरचा पू. साने गुरूजी सेवा सन्मान बुलढाण्याचे नरेंद्र लांजेवार यांना तर गावपातळीवरचा पुरस्कार किशनराव गजभारे यांना आणि जिल्हास्तरावरचा पुरस्कार नृसिंह दांडगे यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर आणि बाबाराव विश्वकर्मा यांना ग्रंथपुरस्कारही प्रदान करण्यात आले. कुंटूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. मधुमती राजेश कुंटूरकर यांची जि.प. नांदेडच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विजय जावंधिया यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नरेंद्र लांजेवार, सौ. मधुमती कुंटूरकर, मुरलीधर बेलखोडे, राजेश कुंटूरकर यांची भाषणे झाली.

या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळू दुगडूमवार यांनी तर प्रास्ताविक संयोजक बालाजी तेजेराव कदम यांनी केले आणि आभार प्रदर्शन कार्यवाह गजानन आडकिने यांनी केले. या कार्यक्रमास कुंटूर पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रसंतांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मारोतराव पा.कदम, राजेश आडकिने, शिवाजी आडकिने, युसूफ शेख, सचिन आडकिने, प्रल्हाद आडकिने, योगेश चिंताके यांच्यासह वाचनालयाच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tag:
Back to Top