BREAKING NEWS

सध्या सैनिक असलेल्यानाच नव्हे तर माजी सैनिकांना महाराष्ट्रात सुद्धा होतो त्रास

9 वर्षांनी एका माजी सैनिकांची आपल्या कुटुंबियांसह खून खटल्यातून सुटका

BY   Posted On : 22 Apr 2017 213

सध्या जम्मू कश्मिरमध्ये सैनिकांसोबत सुरु असलेल्या दुर व्यवहारावर भारतीय संसदेत चर्चा सुरु आहे. पण सैनिकांना आपले सैनिक पद सोडल्यानंतर सुध्दा सार्वजनिक जीवनात किती त्रास आहेत याचा प्रत्यय एका खून खटल्यातून निर्दोष मुक्त झालेल्या अर्धापूर येथील एका सैनिकाच्या प्रकरणावरुन स्पष्टपणे दिसतो. या सैनिकाच्या विरुध्द तक्रार देणारा पोलीस कर्मचारी आहे.

अर्धापूर येथील माणिक लिंबाजी नवले हे 1961 मध्ये सेनेत दाखल झाले. सुरुवातीची नियुक्ती नाशिक येथे केली. 1965 मध्ये मराठा रेजिमेंटमध्ये त्यांना पाठविण्यात आले तेथे त्यांनी सेवा 14 वर्ष बजावली. आपल्या या सेवेत त्यांनी पाच सेने पदके मिळविली. 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात ते जखमी झाले. 1975 मध्ये जखमी अवस्थेत असलेल्या सैनिक माणिक नवले यांना भारतीय सेनेने सेवानिवृत्ती दिली. त्यानंतर पाच वर्षानी सन 1980 मध्ये त्यांना एसटी महामंडळात गार्ड पदावर नोकरी मिळाली तेथून ते 2003 मध्ये सेवानिवृत्त झाले. भारतीय सेनेत दिर्घ सेवा केल्याने महाराष्ट्र शासनाने अर्धापूर शहरातील गट क्र.178 मध्ये एक हेक्टर 13 आर जमीन दिली. ही जमीन अर्धापूर बसस्थानकाच्या शेजारी आहे. या गट क्र.178 मध्ये अर्धापूरचे पोलीस स्टेशन आहे, पोलीस कॉलनी आहे, पाटबंधारे कार्यालय आहे, स्मशानभूमी आहे, क्रिडा संकुलही आहे. त्याच गटातील 1 हेक्टर 13 आर जमीन महाराष्ट्र शासनाने सैनिक माणिक लिंबाजी नवले यांना दिली. आजही सातबारा उताऱ्यावर त्यंाचे नावे आहे.

या जमिनीवर अनेकांनी केलेले अतिक्रमण हे सैनिक माणिक नवले यांना त्रासदायक ठरत होते. त्यामुळे 24 तास उघडे राहणारे कार्यालय म्हणजे पोलीस ठाणे आणि त्यात सैनिक माणिक नवले यांनी अनेकदा अतिक्रमणाविरुध्द दाद मागितली. अतिक्रमणातील काही लोकांनी माजी सैनिक माणिक नवलेविरुध्द तक्रारी केल्या. त्यात अनेकदा पोलीस माणिक नवलेच्या विरुध्द जात असत. अशा या अतिक्रमणात अडकलेल्या माणिक नवले विरुध्द 1999 मध्ये तत्कालीन अर्धापूरचे पीएसआय संजय पवारने त्यांना ठाण्यात मारहाण केली. या मारहाणीचा सर्वाने त्यांनी संजय पवारविरुध्द फौजदारी खटला दाखल केला होता. त्या खटल्यात संजय पवारला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली होती. या सर्व प्रकरणात अर्धापूर येथे कार्यरत पोलीस हवालदार उत्तम वाघमारे यांचा सात वर्षाचा मुलगा संकेत गायब झाला. पुढे त्याचे प्रेत एका विहिरीत मिळाले त्यावेळी हा प्रकार नरबळी प्रकार आहे, अशी त्याची प्रसिध्दी झाली. उत्तम वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुढे गुन्हा क्र.132/2007 दाखल झाला. त्या प्रकरणात माजी सैनिक माणिक लिंबाजी नवले, त्यांची मुलगी वंदना माधव सिधपुरे, कोंडाबाई पांडूरंग माटे आणि सैनिकाची पत्नी वनिताबाई माणिक नवले आणि एक महाराज जनार्धन बासोजी तोरकड अशा सहा लोकांना अटक झाली त्यांना पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचे दोषारोपपत्र 90 दिवसात पोलिसांनी दाखल करणे बंधनकारक आहे. पण तसे पोलिसांनी न केल्यामुळे त्या प्रकरणात या सर्व जणांना जामीन मिळाला.

त्यानंतर माजी सैनिक माणिक नवले यांनी पेालीस अधीक्षक, महिला आयोग आणि माजी सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे आपल्याविरुध्द झालेल्या अन्यायाची तक्रारी दिली. गुन्हा घडल्यानंतर तब्बल तीन वर्षानी 19 ऑगस्ट 2010 ला सहा जणांविरुध्द पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणी न्यायालयासमक्ष आलेल्या पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी कोणताच पुरावा उपलब्ध नाही अशी नोंद आपल्या निकाल पत्रात करुन या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. खटला सुरु असताना महाराज असलेला जनार्धन तोरकड याचा मृत्यू झाला होता. एका सैनिकाने भारत-पाकिस्तान युध्दात जखमी होवून देशासाठी केलेल्या सेवेच्या बदल्यात महाराष्ट्र शासनाने त्यास दिलेली जमीन आजही पूर्णपणे त्यांची नाही. सामान्य जीवन जगत असताना पोलीस आणि जनता या दोघांनी सैनिकाला कोणतीच मदत केली नाही. आज माणिक नवले यांचे वय जवळपास 80 वर्ष असेल. त्यांची जमीन त्यांना मिळेल का नाही त्यांना आज माहित नाही. त्यांच्यावर दाखल झालेल्या खुनाच्या खटल्यातून ते मुक्त झाले आहेत. कमीत कमी त्यांना सन्मान तर मिळावा अशी अपेक्षा माणिक नवले व्यक्त करीत आहेत.

Tag:
Back to Top