BREAKING NEWS

मराठवाड्यातील अल्पभुधारकाची कमाल मर्यादा १५ एकर ग्राह्य धरावी

आ.सतीश चव्हाण यांची मागणी

BY   Posted On : 22 Apr 2017 291

मराठवाड्यातील अल्पभुधारक शेतकर्‍यांची कमाल मर्यादा १५ एकर ग्राह्य धरण्यात यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागात बहूतांशी सिंचनाची सोय झाल्याने येथील शेतकरी चांगले उत्पन्न घेतांना दिसून येतात. मात्र मराठवाडा, विदर्भात सिंचनाचा अनुशेष अद्यापही पूर्ण झाला नसल्याने या भागातील शेतकर्‍यांना पर्जन्यवृष्टीवर अवलंबुन राहावे लागते. परिणामी शेतकरी आत्महत्याचे प्रमाण मराठवाडा व विदर्भात अधिक आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठवाडा व विदर्भात कोरडवाहू जमिनीचे प्रमाण इतर विभागा पैक्षा जास्त आहे. त्यामुळे मराठवाड्यात १५ एकर जमिन असलेला शेतकरी वर्षाला जेवढे शेती उत्पादन घेतो त्यापेक्षा पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रातील २ एकर शेती असलेला अल्पभुधारक शेतकरी अधिक उत्पादन घेत असल्याचे दिसून येते. तसेच मराठवाडा व विदर्भात कोरडवाहू जमीन अधिक असल्याने येथील शेतकर्‍यांना बँका कमी प्रमाणात कर्ज देतात तर पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणातील शेतकर्‍यांना बँका अधिक प्रमाणात कर्ज देतात. त्यामुळे कर्ज वाटपात देखील फार मोठी तफावत जाणवत असल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार महाराष्ट्रातील अल्पभुधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करणार असल्याचे समजते. मात्र यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील अल्पभुधारक शेतकर्‍यांचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे अल्पभुधारकाच्या व्याख्येत अंशत: बदल करणे गरजेचे आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र यासाठी अल्पभुधारकाची कमाल मर्यादा ४ एकर असल्यास मराठवाडा व विदर्भातील अल्पभुधारकांची कमाल मर्यादा १५ एकर ग्राह्य धरण्यात यावी. जेणे करून मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांना याचा फायदा होईल. यासंदर्भात आपण सकारात्मक विचार करावा अशी विनंती आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Tag:
Back to Top