BREAKING NEWS

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखावे - जयंत ओक

BY   Posted On : 22 Apr 2017 90

'गप्पागोष्टी' फेम कलाकार म्हणून श्री. जयंत ओक गेली 25 वर्षे ओळखल्या जातात. आजपर्यंत त्यांचे 1700 हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. भारताबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई, शारजा, अबूधाबी, दोहा, कतार आदी देशांमध्ये कार्यक्रम झाले आहेत,इतका हा कार्यक्रम देशात आणि परदेशात लोकप्रिय आहे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास आपल्या जीवनाला निश्चित दिशा मिळू शकते, असे ओक यांना मनापासून वाटते. त्यांच्याशी झालेल्या या गप्पागोष्टी ......

शिक्षकांच्या संदर्भात बोलताना जयंत ओक म्हणाले, मी म्युनिसिपालटी शाळेत होतो. पेडणेकर मास्तर बीजगणित शिकवत होते. त्यातील 'क्ष' माना हा 'क्ष' मला कधी कळलाच नाही. ते शिकवताना शाळेत आम्हाला बाहेरुन गाणे ऐकायला येत असे. त्यावर मी मस्तपैकी ठेका धरायचो. हे सगळे नकळत घडायचे. शेवटी एकदा मास्तरांनी मला बोलाविले. म्हणाले ठेव टेबलावर हात ! मी हात ठेवताच त्यांनी त्यावर डस्टरने मारले. का ? तर शिकवताना तबला वाजवितो म्हणून. पण तास संपल्यानंतर त्यांनी मला मायेने जवळ बोलवून घेतले आणि सांगितले जा, तू तबला शिक. तुझ्यात ती कला उपजत आहे. आज मला त्याचे आश्चर्य वाटते त्यावेळी मला मास्तरांनी मारले नसते तर? तबला शिक म्हणून सांगितले नसते तर? मला खूप थोरा-मोठ्यांबरोबर तालवाद्याची साथ करायला कधी मिळालीच नसती आणि कलाकार म्हणून कदाचित घडलोच नसतो.

श्री. जयंत ओक यांचा जन्म 30 नोव्हेंबर, 1949 रोजी मुंबईतील गिरगांव मध्ये झाला. वडिल भिक्षूकी करायचे तर काका नाटकांमध्ये अभिनय करायचे. त्यामुळे त्या काळातील सर्व थोर नाटककार, अभिनेते, नानासाहेब फाटक, चित्तरंजन कोल्हटकर, वसंत शिंदे, सुरेश हळदणकर, दाजी भाटवडेकर, वसंत सबनीस, राम मराठे, कुमार गंधर्व यांची घरी सतत ये जा असे. त्या वातावरणाचा जयंत ओक यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पडला. जयंत ओक यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गिरगावातील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झाले तर पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण आर्यन शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण भवन्स कॉलेज मध्ये झाले. कुमार गंधर्व यांचे शिष्य सत्यशील देशपांडे हे जयंत ओक यांचे वर्गबंधू. देशपांडेंच्या घरी नेहमी संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा वावर असे. त्यामुळे तेथील संगीत ऐकून ओक यांचा संगिताचा कान तयार झाला, संगिताची गोडी निर्माण झाली. त्यात शाळेतील शिक्षकांनी कलागूण ओळखून तबल्याचा वर्ग लावायला सांगितले आणि तबला वादनाचे रितसर शिक्षण घेतले. पंढरीनाथ नागेशकर त्यांचे गुरु होते. पुढे ओक अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाततून गायनही शिकले.

जयंत ओक 1977 साली दूरदर्शन मध्ये निर्मिती सहायक म्हणून रुजु झाले. तेथे ज्येष्ठ निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांनी गितांच्या चाली लावण्याची संधी दिली. त्यामुळे शेकडो गाण्यांना चाली लावता आल्या. दूरदर्शनच्या संगीत कार्यक्रमांमध्ये माणिक वर्मा, जोस्ना भोळे, अनुप जलोटा, वसंतराव देशपांडे अशा मोठ-मोठ्या कलाकारांबरोबर संधी मिळाली. ज्ञानदीपकार आकाशानंद यांना जयंत ओक आपले गुरु मानतात. पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे हे आकाशानंदांकडून ओक शिकले. ज्याचा पुढे त्यांना आयुष्यभर उपयोग होत राहिला. पिन टु पियानो तसे प्युन ते प्रोड्युसर असे कुठलेही काम करण्याची तयारी ठेऊन त्यांनी दूरदर्शनमध्ये प्रवेश केला. 1977 ते 1992 अशी जवळपास 15 वर्षे ओक यांनी दूरदर्शनमध्ये सेवा केली. या दरम्यान, दूरदर्शनच्या गाजलेल्या गप्पागोष्टी या मालिकेतील त्यांची बन्याबापूची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. निर्माते शिवाजी फुलसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या मालिकेचे जवळपास 100 भाग 5 वर्षे सारित झाले. या मालिकेचे लेखन, दिग्दर्शन मानसिंग पवार करीत तर रवि पटवर्धन, राजा मयेकर, माया गुर्जर अभिनय करीत. अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.1992 नंतर जयंत ओक यांनी दूरदर्शन सोडून स्वत:चा स्वतंत्र असा ''गप्पा गोष्टी'' हा निखळ कौटुंबिक मनोरंजनाचा एकपात्री प्रयोग सुरु केला. कुठल्याही प्रकारचे नेपथ्य नाही, वेगळी वेशभूषा नाही, केवळ एक मफ्लर, टोपी एवढ्या भांडवलावर गेली 25 वर्षे हा कार्यक्रम रसिकांना खिळवून ठेवत आहे. हे जयंत ओक यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य आहे.

जयंत ओक यांच्या गप्पागोष्टीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पु.ल.देशपांडे, सुधीर फडके, सुनील गावसकर, अनिल मोहिले, अशोक पत्की अशा नामवंतांची दाद मिळाली आहे. गप्पागोष्टीत ओक किस्से, नकला, विनोद, साहित्य, काव्य संगीत, अभिनय हे अत्यंत सहज सुंदरपणे सादर करतात. त्यांचा कार्यक्रम पाहताना प्रेक्षकही त्यात समरस होतात हे या कार्यक्रमाचे मोठेच बलस्थान आहे. गप्पा गोष्टींबरोबरच जयंत ओक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे खेळ नशिबाचे, यशवंतराव चव्हाण आदी चित्रपटांतून महत्वाच्या भूमिका साकार केल्या आहेत.

जयंत ओक यांच्या वाटचालीतील अविस्मरणीय प्रसंग म्हणजे त्यांचा 1101 वा प्रयोग अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दिनांक 22 ऑक्टोबर, 2010 रोजी झाला. कोजागिरीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रमिला ओक-सवी, विद्या देसाई, सविता गोखले यांनी पुढाकार घेऊन केलेले सर्व अमेरिकेतील वॉशिंग्टन, अटलांटा, कनेक्टीकट, न्यू जर्सी येथीलही त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले.तर ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबॉर्न येथील कार्यक्रम, तेथील रेडिओवरील मुलाखत आणि 21 दिवसांचे वास्तव्य आजही जयंत ओक विसरु शकलेले नाहीत.

जयंत ओक यांना 1994 साली पुणे येथे झालेल्या एकपात्री कलावंतांच्या संमेलनात पुणे महानगर पालिकातर्फे स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर 1996 साली मुंबई मराठी साहित्य संघात हास्य सम्राट जयंत ओक पुरस्कार देण्यात आला. 1997 साली तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते विनोदी अभिनेता पुरस्कार, इंडिया इंटरनॅशनल टुरिस्ट कौन्सिलचा पुरस्कार, 2008 साली चतुरस्त्र कलाकार आचार्य अत्रे पुरस्कार, 2010 साली पुणे येथे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने ग.दि.माडगूळकर यांच्या नावाने देण्यात येणारा गदिमा रंगयात्री पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषरिषदेचा सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कार 2012 साली मिळाला आहे.

जयंत ओक यांच्या पत्नी संध्या या पूर्णवेळ गृहिणी आहे. कन्या भक्ती सोमण पत्रकार आहे. तर चिंरजीव जयेश हा एम.कॉम प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन सध्या खाजगी नोकरीत आहे. आई-वडिलांइतकेच शिक्षकांचे स्थान आपल्या जडणघडणीत महत्वाचे ठरले. म्हणून आपण आजही त्यांना वंदनिय मानतो, असे ओक विनम्रपणे नमूद करतात. श्री. जयंत ओक यांच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.

Tag:
Back to Top