BREAKING NEWS

राज्यातील अवैद्य दारू विक्री आणि निर्मिती 30 एप्रिल पर्यंत कायम बंद करण्यासाठी पोलिसांना कृती आराखडा

BY   Posted On : 22 Apr 2017 772

पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील अवैध दारु विक्री व अवैध दारु निर्मिती या धंद्यावर विशेष मोहिमेव्दारे कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. नांदेड जिल्ह्याला सुध्दा हे आदेश प्राप्त झाले आहेत.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या या पत्रात प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली अप्पर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आणि स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करुन जिल्ह्यात अवैध दारु धंद्यांविरुध्द धडक कारवाई करण्याचा आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना दिली आहे. पोलीस आयुक्तालयातील आयुक्तांसह परिमंडळ उपआयुक्तांनी ही कारवाई करायची आहे. या कारवाई दरम्यान पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 10 एप्रिल असे आयोजन करुन अवैध दारु धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी कारवाई करावी, असे नमुद आहे. दुसऱ्या टप्प्यात दि.20 ते 30 एप्रिल अवैध दारु धंद्यांचे समूळ उच्चाटन कसे व्हावे यासाठी प्रभावी कारवाई करावी, असे म्हटले आहे.

या दोन्ही कालखंडात केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करताना पोलिसांच्या कोणत्या घटकाने ही कारवाई केली, कारवाईची एकूण ठिकाणी कोणती आहेत, कारवाई सामील झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे व संख्या अवैध दारु जप्त केलेला मुद्देमाल आणि नाश केलेला मुद्देमाल लिटरमध्ये नमुद करायचा आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत आणि नाश केलेल्या मुद्देमालाची किंमत या तक्त्यात नमुद करुन पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी सविस्तर तक्ता पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवायचा आहे. एकूणच 30 एप्रिलपर्यंत राज्यभरातून अवैध दारु निर्मिती आणि विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यात यावे, असे शासनाला वाटते. नांदेड जिल्ह्यात सुध्दा प्राप्त झालेल्या या आदेशावर पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना कारवाईचा आराखडा तयार करुन त्वरित प्रभावाने धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Tag:
Back to Top