BREAKING NEWS

एमएचटी-सीईटीसाठी परीक्षेच्या नियोजनाबाबत बैठक संपन्न

BY   Posted On : 22 Apr 2017 51

आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या तीनही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा गुरुवार 11 मे 2017 रोजी होणार आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यात 8 हजार 3 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा नांदेड शहर आणि परिसरातील 27 केंद्रावर होणार. या परीक्षेच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी परीक्षेच्या नियोजनाबाबत आढावा घेतला.

बैठकीस पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, तहसिलदार ज्योती पवार, परीक्षेसाठी नियुक्त जिल्हा संपर्क अधिकारी प्राचार्य पी. डी. पोपळे, सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी डी. एम. लोकमनवार, व्ही. बी. उश्केवार, एस. आर. मुधोळकर, ए. बी. दमकोंडवार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. एस. जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. एच. आर. गुंटूरकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता ए. ए. सौदागर, राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक अधिकारी प्र. स. नेहूल आदींची उपस्थिती होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन परीक्षा केंद्र, तेथील सुविधा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त अशी अनुषांगीक बाबींबाबत सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश दिले. यावेळी झालेल्या चर्चेत परीक्षेसाठी केंद्र समन्वयक तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत तसेच परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्याच्या 2 मे व 9 मे 2017 रोजीच्या प्रशिक्षणाबाबतही चर्चा झाली.

Tag:
Back to Top