BREAKING NEWS

नांदेड शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा - महापौर स्वामी

BY   Posted On : 22 Apr 2017 82

नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा असे आदेश महापौर सौ. शैलजा स्वामी यांनी दिले. तसेच पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा अहवाल दररोज देण्यात यावा असे स्पष्ट केले.

अनियमित व दूषित पाणीपुरवठ्यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर कक्षात महापौर सौ. शैलजा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आयुक्त समीर उन्हाळे, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, विरोधी पक्षनेते बंडू खेडकर, महिला बालकल्याण सभापती सौ. शीला कदम, हबीब बावजीर, अभिषेक सौदे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, गिरीष कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

गेल्या काही दिवसांपासून शहरात दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांतून तक्रारी वाढल्यानंतर महापौर कक्षात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाण्याचा आढावा घेण्यात आला त्यानंतर शहरात सुरळीत व नियमित पाणीपुरवठा कर ण्यात येऊन दूषित पाणीपुरवठा होऊ नये याची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले. पाणीपुरवठ्याच्या काळात अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवू नयेत, नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी पाण्याची दररोज तपासणी करण्यात यावी, या तपासणीचा अहवाल दररोज महापौर यांना देण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. पाणी पुरवठा करताना पहाटे ते संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत करावा, मध्यरात्री पाणीपुरवठा करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले.

शहरातील अनेक हातपंप नादुरूस्त आहेत. हे हातपंप त्वरित दुरूस्त करण्यात यावेत, ज्या ठिकाणी हातपंपावर मोटारी बसवून पाणीपुरवठा करता येईल त्याठिकाणी तशी व्यवस्था करण्यात यावी, शहरातील सर्वच भागात मुबलक व नियमित पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, ज्या ठिकाणी लिकेज असतील त्याची त्वरित दुरुस्ती करावी, शहरातील काही भागात पाणीपुरवठा होत नसेल तर त्याठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असेही सांगण्यात आले. यावेळी मनपाकडे 9 टॅंकर असल्याचे सांगण्यात आले. त्यातील 2 टॅंकर नादुरुस्त आहेत. ज्या भागात टॅंकरची मागणी होईल त्याठिकाणी टॅंकर उपलब्ध करून द्यावेत, नादुरूस्त टॅंकर त्वरित दुरूस्त करून घ्यावा असेही सांगण्यात आले.

आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, काही भागात अधिक पाणी तर काही भागात कमी पाणीपुरवठा होत आहे. सर्वच भागांना तेवढाच वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा याबाबत काही ठिकाणी जलवाहिन्यांचा अडथळा आहे ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर ज्या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे त्या भागातील जलवाहिनीची कामे त्वरित हाती घेऊन ते पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करावेत, उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता ही कामे लवकर कशी पूर्ण होतील याची दखल घेऊन कामे पूर्ण करण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले. उन्हाळ्यात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोन अंतर्गत व टाकीवरील कर्मचाऱ्यांशी संपर्कात रहावे, काही ठिकाणी अडचण आल्यास वरिष्ठांनी त्वरित घटनास्थळी भेट द्यावी असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

Tag:
Back to Top