BREAKING NEWS

देशी दारूचे समर्थन करणार्या अशा भ्रष्ट अधिकार्याला तात्काळ निलंबित करा

घोटीचे उपसरपंच बालाजी पावडे यांची उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार

BY   Posted On : 22 Apr 2017 541

मौजे घोटी येथे गेल्या रविवारी (दि.09) दारूड्यांच्या त्रासाला कंटाळून महिलांनी देशी दारूच्या बाटल्या दुकानासमोर फोडून रोष व्यक्त करत दुकान बंद पाडले. ते दुकान परत सुरू कर नाहीतर तुझे उपसरपंच पद काढून टाकतो आणि तुझ्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करीन अशी धमकी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दूरध्वनीवरून दिली. त्यामुळे देशी दारूचे समर्थन करणार्या अशा भ्रष्ट अधिकार्याला तात्काळ निलंबित करावे, त्यांच्या कडून माझ्या जीवास धोका आहे, अशी तक्रार घोटीचे उपसरपंच बालाजी पावडे यांनी पोलीस उपविभागीय अधिकार्यांकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य मार्गापासून 500 मीटर अंतरावरील सर्व दारू दुकानांचे परवाने राज्य शासनाने 1 एप्रिल 2017 पासून रद्द केलेले आहेत. त्यामुळे मद्यपींची गोची झालेली आहे. त्यात किनवट पासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावरील घोटी येथील देशी दारूचे दुकान चालू असल्याचे कळाल्यानंतर सर्व तळीरामांची एकच गर्दी तिथे होऊ लागली. दारूच्या नशेत कुठेही लघुशंका करणे, रस्त्यावर गोंधळ घालणे, महिलांची छेड काढणे आदी प्रकाराने त्रस्त झालेल्या महिलांनी एल्गार पुकारून ते दारू दुकान बंद पाडले. यापूर्वीच या दारू दुकानामुळे गावातील व्यसनाधीनता वाढून घरातील लोक बरबाद होत आहेत म्हणून या दुकानाला गावाच्या हद्दीतून हटविण्याची मागणी 01 ऑगस्ट 2016 च्या पेसा ग्रामसभेच्या ठरावाद्वारे केली होती. मात्र, प्रशासनाने आतापर्यंत कुठलेही पाऊल न उचलल्याने सततच्या त्रासापायी दि. 09 रोजी महिलांना दुकान बंद करण्याचा हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.

अशी हकीकत असतांना शुक्रवारी दुपारी 03.51 वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयातून 02469-222228 या दूरध्वनी क्रमांकावरून मला फोन आला. त्यात डॉ.राजेंद्र भारूड यांनी मला या भानगडीत कशाला पडता. शासनाने परवानगी दिलेले दुकान बंद करणारे तुम्ही कोण ? असे दरडावले व नंतर ते बंद झालेले दुकान सुरू करा अन्यथा तुझे उपसरपंचपद काढून तुझ्यावर दोन-चार गुन्हे दाखल करून तडीपार करीन अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांच्या पासून माझ्या जिवित्वास धोका असून, मला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच देशी दारूचे समर्थन करणार्या या भ्रष्ट अधिकार्याला त्वरीत निलंबित करावे. त्यासाठी मी येत्या 20 एप्रिल 2017 पासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, असा लेखी इशारा उपसरपंच बालाजी पावडे यांनी पोलीस उपविभागीय अधिकार्यांसह मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, विरोधी पक्षनेता व पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. तसेच उपरोल्लेखित दूरध्वनीतील संभाषणाची ऑडिओ सी.डी.ही लेखी अर्जासोबत जोडल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड हे किनवट येथे रूजू झाल्यापासून भ्रष्ट कर्मचार्यांविरूद्ध कडक कार्यवाही केली होती. अन्याय कारक व जनहिताविरुद्धच्या बाबीमध्ये व्यक्तीश: लक्ष घालून अनेक समाजोपयोगी कारनामे यशस्वी करून एक नितीमान,कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लोकप्रशंसा मिळविली. असा अधिकारी असा कसा वागू शकतो अशी साधक-बाधक चर्चा शहरांत चालू आहे. या प्रकरणी डॉ.भारूडांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्यांशी भ्रमनध्वनीवरून संपर्क करण्याच्या प्रयत्न केला असता, ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्यांची म्हणणे कळू शकले नाही.

Tag:
Back to Top