BREAKING NEWS

अल्पवयीन बालिकेला पळविणाऱ्या दोन युवकांना सक्तमजुरी आणि रोख दंड

BY   Posted On : 22 Apr 2017 354

एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याप्रकरणी दोन जणांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी 3 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकास 5 हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील एक महिला एक पुरूष अशा दोघांना मात्र न्यायालयाने मुक्त केले आहे.

दि. 27 जुलै 2011 रोजी सकाळी 10.30 वाजता शहरातील वसंतनगर भागात असणाऱ्या एका नामांकित शाळेतून एका 15 वर्षीय बालिकेला दिनेश विजय जाधव (21), शिशुपाल रंगनाथ राठोड (23) रा. लोहारा खु. ता. औंढा जि. हिंगोली यांनी आपल्यासोबत मोटारसायकलवर नेत असताना त्या अल्पवयीन बालिकेच्या लहान बहिणेने पाहिले. तिने त्या दोघांना तुम्ही माझ्या बहिणीला कोठे जात आहात याची विचारणा केली. तेव्हा तुझा मामा अत्यावस्त स्थितीत असल्याने त्याला भेटण्यासाठी तिला घेऊन जात असल्याचे सांगितले. छोट्या बहिणीने ही बाब घरी जाऊन आपल्या आईला सांगितले. आई आणि दोन मुली आपल्या पतीपासून वेगळ्या नांदेड येथे माहेरी राहत होत्या. त्यांचे मूळ गाव कळमनुरी तालुक्यात आहे.

छोट्या मुलीने सांगितल्याप्रमाणे दुरध्वनीवरून आपली अल्पवयीन बालिका कोठे आहे याची माहिती आईने घेतली पण तिला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तिने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत दिनेश जाधव, शिशुपाल राठोड यांच्यासह दिनेशचे वडील विजय केशवराव जाधव (39) आणि सौ. मिरा कृष्णा राठोड नांदेड या चार जणांविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा क्र. 137/2011 कलम 366, 376 भारतीय दंडविधानप्रमाणे दाखल केला. पुढे काही दिवसांत तत्कालीन पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महल्ले यांनी आरोपींना अटक केली. तपासाअंती न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

नांदेड न्यायालयाने या प्रकरणी 13 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदविले. उपलब्ध पुराव्याआधारे न्यायाधीश सविता बारणे यांनी अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याप्रकरणी दिनेश विजय जाधव आणि शिशुपाल रंगनाथ राठोड या दोघांना दोषी मानले. या दोघांनी दिनेशसोबत अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्यासाठी तिला पळवून नेले होते. या प्रकरणाीतील दिनेशचे वडील विजय जाधव आणि सौ. मिरा राठोड या दोघांची न्यायालयाने सुटका केली. गुन्हा सिद्ध झालेल्या दिनेश जाधव आणि शिशुपाल राठोड या दोघांना न्यायाधीश सविता बारणे यांनी 3 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकास 5 हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. डी.जी. शिंदे यांनी मांडली तर आरोपीच्यावतीने ऍड. रमेश परळकर आणि ऍड. सराफ यांनी काम केले.

Tag:
Back to Top