BREAKING NEWS

यापुढे गुत्तेदाराना धनाकर्षाऐवजी आता द्यावी लागणार बँक गॅरंटी

BY   Posted On : 22 Apr 2017 352

शासनाने कमी दराच्या निविदेसाठी बँक हमी (गॅरंटी) देणे आवश्यक केले आहे. यापूर्वी हे काम धनाकर्षावर भागत होते, परंतू यापुढे धनाकर्षाऐवजी बँक गॅरंटीच द्यावी लागणार असल्याची माहिती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एन.डी. बिराजदार यांनी दिली. यापूर्वी नावाजलेल्या बँकांना बड्या कंत्राटदारांचे खाते आपल्याकडे असावे म्हणून ते त्यांची विनवणी करीत. आता मात्र कंत्राटदारांनाच बँकांचा दरवाजा ठोठावा लागणार आहे.

यापूर्वी अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्यास निम्नतम देकाराच्या कंत्राटदाराकडून निविदा जेवढ्या दराने कमी असेल, तेवढ्या रक्कमेचा धनाकर्ष निविदेसोबत सादर करणे बंधनकारक होते. परंतू यात शासनाने आता सुधारणा केली असून, अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्यास धनाकर्षाऐवजी बँक गॅरंटी देणे आवश्यक केले आहे. कमी दराच्या निविदेसोबत धनाकर्ष (चेक) नव्हे तर, बँक गॅरंटीच स्विकारली जावी, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. विहीत कंत्राट मुदतीत म्हणजेच कामाचा दोष दायित्व कालावधी पूर्ण होईपर्यंत बँक गॅरंटीची विधीग्राह्यता कायम राहील, असेही शासनाने आदेशात बजावले आहे. नेमक्या याच कारणामुळे बँका कंत्राटदारांना गॅरंटी देतांना पुन्हा पुन्हा विचार करण्याची शक्यता आहे.

बांधकाम विकासाचे काम व अनियमितता ह्या हल्ली एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. त्यातही कामांचे कंत्राट मिळविण्यासाठी गुत्तेदारांमध्ये कमालीची स्पर्धा लागलेली आहे. यातूनच अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने निविदा भरण्याचा पर्याय कंत्राटदार स्विकारीत आहेत. इतरांपेक्षा कमी दराने निविदा भरून कामाचे कंत्राट पदरात पाडून घेण्यास कंत्राटदार पसंती देत आहेत. परंतू अनेकदा कमी दराच्या निविदेमध्ये सदरचे काम पूर्ण झाले नसल्याचे अनेक दाखले आहेत. कमी दराची निविदा भरून काम मिळविल्यानंतर सदर कंत्राटामध्ये आपण नुकसानीत चालल्याचे लक्षात येताच ते काम अर्धवट सोडून कंत्राटदाराने पळ काढल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच शासनाने नव्या निर्णयात धनाकर्षाऐवजी बँक गॅरंटी आवश्यक करतांनाच कामाचा दोेष दायित्व कालावधी पूर्ण होईपर्यंत ही बँक गॅरंटी विधीग्राह्य केली आहे.

कंत्राटदार म्हणजे आर्थिकदृष्ट्या बडी हस्ती आणि त्यांचे आर्थिक व्यवहारही लाखो व करोडोच्या घरामध्ये असतो. त्यामुळे अनेक नावाजलेल्या बँकांही कंत्राटदारांना आपले खातेदार होण्यासाठी गळ घालतात. यापुढे मात्र बडा कंत्राटदार हा आपला खातेदार असूनही, त्यांना बँका गॅरंटी देण्यासाठी धजावतीलच, असे ठोसपणे सांगता येणार नाही. परिणामी कमी दराच्या निविदेसाठी बँक गॅरंटी मिळविण्यासाठी गुत्तेदारांना आता निश्चितच बँकांची मनधरणी करावी लागणार आहे.

Tag:
Back to Top