BREAKING NEWS

रोशनसिंघ,अजितसिघ आणि जसवंतसिघ यांच्या विरुद्ध न्यायालयाने जारी केला जाहीरनामा

BY   Posted On : 22 Apr 2017 341

फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या एका खून प्रकरणातील तीन फरार आरोपीविरुध्द न्यायालयाने जाहीरनामा काढला आहे. या जाहीरनाम्यावर पहिले जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांची स्वाक्षरी आहे.

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी 2016 मध्ये रात्री आठ वाजेच्या सुमारास सतेंद्रसिंघ चरणसिंघ संधू या युवकाचा खून झाला होता. त्या प्रकरणी गुरमितसिंघ व इतर दोघांना अटक झाली होती. याच खुन प्रकरणातील अद्याप न सापडलेले आरोपी रोशनसिंघ बाबुसिंघ माळी, अजितसिंघ बाबुसिंघ माळी आणि जसवंतसिंघ राजासिंघ सेवादार यांच्याविरुध्द जिल्हा न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 82 नुसार जाहीरनामा प्रसिध्द करण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत.

या प्रकरणातील तीन आरोपी जाणूनबुजून न्यायालयात हजर राहत नाहीत किंवा त्यांच्याविरुध्द जाहीर झालेले अटक वॉरंट तामील होवू देत नाहीत. म्हणून सरकार पक्षाने दिलेल्या अर्जावरुन न्यायाधीश आनंद यावलकर यांनी रोशनसिंघ माळी, अजितसिंघ माळी आणि जसवंतसिंघ सेवादार या तिघांविरुध्द जाहीरनामा काढला आहे. या जाहीरनाम्याच्या प्रती न्यायालयाने जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार नांदेड आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला सुध्दा दिल्या आहेत. त्यानुसार या प्रकरणाचे तपासिक अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी हा जाहीरनामा प्रसिध्द करण्याची विनंती वर्तमानपत्रांना केली आहे. या जाहीरनाम्यानुसार हे तीन फरार आरोपी 25 एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांच्याविरुध्द पुढे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 83 प्रमाणे त्यांना घोषित आरोपी जाहीर केले जाईल आणि त्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीच्या जप्तीची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे इतवाराचे पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांनी सांगितले आहे.

Tag:
Back to Top