Breaking news

नियमित पावसासाठी वैज्ञानिकदृष्ट्या जल व वन संपदेचे व्यवस्थापन आवश्यक -- देवेंद्र फडणवीस

*अंबाझरी पाणलोट विकास व मृद-जलसंधारण व
जैव विविधता उद्यान विकास कामाचे भुमिपूजन
नागपूर(प्रतिनिधी)नियमित पावसासाठी वैज्ञानिकदृष्ट्या एकात्मिक व्यवस्थापन करुन जलसंपदा आणि वन संपदेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून त्यासाठी जलसंपदा आणि वन संपदेचे संवर्धन करावे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वन विभागाच्यावतीने आयोजित अंबाझरी पाणलोट विकास, मृद-जलसंधारण कामाचे भुमिपूजन तसेच जैव विविधता उद्यान विकास कामाचे भुमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर होत्या. आमदार समीर मेघे, यांच्यासह नगरसेवक परिणय फुके, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, वन विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक ए.के.निगम, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री.भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.एस.के.सिन्हा, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी.एस.रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

अंबाझरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संरक्षित वन भूमीत जैवविविधता उद्यान विकास करण्याचा अतिशय चांगला संकल्प वन विभागाने हाती घेतला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी वन विभागाचे अभिनंदन केले. नागपूर जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचे अतिशय चांगले काम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून झाले. अंबाझरी नागपूरचे वैभव आहे. नागनदी पुनर्जिवित करण्यासाठी अंबाझरी पाणलोट क्षेत्राचा विकास व त्याचबरोबर मृद जलसंधारण कामाचे संवर्धन आवश्यक आहे. नागनदी शुध्द पाण्याने पुनर्जिवित होऊ शकते. असे सांगून ते म्हणाले की, वैज्ञानिकदृष्ट्या एकात्मिक व्यवस्थापन करुन जलसंपदा आणि वन संपदेचे नियोजन केल्यास योग्य पाऊस पडु शकतो.

महाराष्ट्र खूप मोठ्या दुष्काळाशी सामना करित आहे. राज्यातील सुमारे 39 हजार गावांपैकी 26-27 हजार गावात दुष्काळ आहे. मागच्या वर्षी 25 हजार गावांमध्ये दुष्काळ होता. पाणलोटाच्या कामात अडथळे आणण्याचे काम आपण केले. त्यामुळे जलसंपदा आणि वन संपदा नष्ट झाली. जिथे वन संपदा, जलसंपदा नष्ट होते तेथे पाऊस पडणे बंद होते. आपण हे काम करत असतांना केवळ एक पर्यटन स्थळ तयार करीत नाही तर आपल्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये पुढाकार घेऊन हे काम होणार आहे. वन विभागाने निश्चित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करावे यासाठी ज्या ज्या विभागाची मदत लागणार आहे ती देण्यात येईल. शिवाय आवश्यक निधीही उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. वन विभागाकडून या प्रकल्प क्षेत्रात ठिकठिकाणी वनतळी निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या प्रकल्पात जल व वन संपदेचे संवर्धन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करुन प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.निगम म्हणाले की, नागपूरच्या मधोमध असलेल्या अंबाझरी पाणलोट विकास क्षेत्र व मृद जलसंधारण प्रकल्पाचा विकास करण्याची योजना जिल्हा प्रशासन व वनविभागाने आखली असून 758 हेक्टर पाणलोट क्षेत्रात विस्तारलेल्या या भागाच्या आराखड्यात जवळपास 14 कोटी रुपये प्रस्तावित खर्च आहे. या प्रकल्पामुळे शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, पर्सिस्टंट कंपनी, स्वयंसेवी संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये यांचे देखील सहकार्य राहणार आहे. महापौर प्रविण दटके म्हणाले की, या प्रकल्पाला महापालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. या प्रकल्पामूळे नागपूर हे हिरवे शहर म्हणून नावारुपास येईल असा विश्वास व्यक्त केला.

अंबाझरी पाणलोट क्षेत्राच्या विकास आराखड्यात विविध प्रजातींची लागवड होईल. या क्षेत्राकडे विविध पक्षी, फुलपाखरे व लहान तृणभक्षी प्राणी आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. 25 ते 30 हेक्टरच्या आकारात 33 खंडांमध्ये हा परिसर विभागण्यात येईल. यात औषधी वनस्पती उद्यान, फुलपाखरु उद्यान, नक्षत्र वन, सुगंधी वनस्पती उद्यान, नवग्रह उद्यान, पंचवटी उद्यान, बेल वन, दशमूळ वन आदींचा समावेश राहणार आहे. शिवाय बांबूच्या विविध प्रजातींची लागवड, करंज , नीम, मोह, कुसुम, पळस या तेल देणाऱ्या बियांच्या वृक्ष प्रजातींची जैवइंधन वने या खंडात लागवड होईल. यासोबतच लाख वने, वड वने, चाफा वने, हिरडा, बेहडा व आवळा ही त्रिफळा वने, डिंक वने, आंबा व चिंच वने, पाम प्रजातींची लागवड तसेच शोभिवंत झाडांची वने असणार आहे. एक खंडामध्ये फळे देणाऱ्या प्रजाती, यात सिंगापूर बोर, वड आदींची लागवड करुन तिथे पक्षी नंदनवन तयार करण्यात येईल.

साकारण्यात येणारा वनप्रजाती संग्रह विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षणाकरिता उपयुक्त ठरावा, असा आमचा मानस राहील. अंबाझरी पाणलोट क्षेत्रामध्ये प्रस्तावित असलेल्या या उपक्रमामध्ये शहरालगत उत्कृष्ट दर्जाचे एक जैव विविधता केंद्र तयार होईल व ते भविष्यात शहरवासीयांना निरोगी स्वच्छ हवेचा पुरवठा करणारे केंद्र ठरेल. राष्ट्रपती भवनात औषधी उद्यान ज्याप्रकारे साकारण्यात आले, त्याच धर्तीवर अंबाझरी पाणलोट विकास व मृद जलसंधारण प्रकल्पाचा विकास साधला जाणार आहे. राष्ट्रपती भवनातील उद्यान साकारणारे जे. ए. सी. एस. राव यांच्या मार्गदर्शनात हे उद्यान साकारण्यात येणार आहे.

Related Photos