Breaking news

संत गाडगेबाबांना अभिप्रेत असलेला समाज घडवू ; जागतिक बँकेच्या मदतीने दुष्काळमुक्त योजना राबविणार - फडणवीस

* मराठवाडा व अमरावती विभागातील 4 हजार गावांसाठी,
4 हजार कोटी रुपयाचा दुष्काळमुक्तीचा प्रस्ताव केंद्राला सादर
*जागतिक बँकेकडून दोन महिन्यात मान्यता मिळणार

अमरावती, दि.8 : संत गाडगेबाबांना अभिप्रेत असलेला समाज आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असून, टंचाईसदृश्य व अविकसित समजल्या जाणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील 4 हजार गावांमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी उपाय म्हणून 4 हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असून जागतिक बँकेच्या सहाय्याने दुष्काळ मुक्ती योजना राबवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांच्या जन्मगावी शेंडगाव (खासपूर), ता.अंजनगाव सुर्जी येथे गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचे भुमिूपजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्यासह आ.रमेश बुंदिले, आ.प्रभादास भिलावेकर, आ.डॉ.अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष देहणकर, शिवराय कुलकर्णी, शेंडगावच्या सरपंच कल्पना खंडारे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूनिल पाटील, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, उप विभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसिलदार पवार, संत गाडगेबाबांचे नातू हरीनारायण जाणोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाडा व अमरावती विभागातील 4 हजार गावातील दुष्काळ कायमपणे संपवून या गावात पिण्याच्या पाण्याचे नियोजन, ठिबक सिंचन, पिकाचे नियोजन, बाजारपेठांची उपलब्धता याचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे. तो केंद्रिय कृषि मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केला असून त्यांच्या मार्फत जागतिक बँकेकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जागतिक बँकेकडून दोन महिन्यात मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बळीराजा जिवंत राहिल्यास सर्व सामान्य जनता सन्मानाने जगू शकेल. यासाठी मराठवाडा व विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प जे तीन वर्षात पूर्ण करु शकतो या प्रकल्पासाठी सात हजार कोटी रुपयाची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच राज्यातील मोठ्या प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रुपयाची केंद्राकडे मागणी केली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लोकसहभागातून निर्माण झालेली चळवळ चिरकाल टिकते. संत गाडगेबाबांनी स्वत: हातात झाडू घेऊन ग्राम स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. त्यांच्यामागे सर्वच लोक स्वच्छतेच्या कामात उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना मांडली. मागील 65-67 वर्षानंतरही हागणदारीमुक्ती झाली नाही. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, गावात स्वच्छता नाही हे करायचे असेल तर गावाचा, सर्व सामान्यांचा सहभाग आवश्यक आहे. तोपर्यंत स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना यशस्वी होणे शक्य नाही. राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान नावाने पुरस्कार घोषित केले. याअंतर्गत हागणदारीमुक्त गाव व स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. या अभियानासाठी पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. मागील एक वर्षात पाच हजार गावे निर्मल ग्राम झाली आहे. आजही ती गावे पूर्णपणे स्वच्छ असल्याचे पहायला मिळतात हे या अभियानाचे यश आहे.
शासनाने लोकसहभाग घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची संकल्पना सुरु केली. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान योजना सुरु केली. पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी कार्यक्रम हाती घेतले. 6 हजार गावात जलसंवर्धनाची सव्वा लाख कामे पूर्ण केली. त्यातून 24 टीएमसी जलसाठा निर्माण झाला. साडेसहा लाख हेक्टर जमिनीला पाणी देता येईल एवढा जलसाठा निर्माण झाला. 1400 कोटी रुपये यावर खर्च झाले. 300 कोटी रुपयाचा लोकसहभाग प्राप्त झाला.

मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाने सुरु केली. या योजनेतंर्गत प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. राज्यासाठी 50 हजार शेततळ्याचे उद्दिष्ट असतांना केवळ तीन आठवड्यात एक लाख लोकांनी शेततळ्यासाठी अर्ज केले. 25 हजार शेततळ्यांच्या कामांची सुरुवात झाली. या योजनेची ही मोठी फलश्रुती म्हणावी लागेल असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मागील वर्षीच्या पावसाळ्यात मोठा खंड पडला होता. जलयुक्त शिवाराच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळाले व पिके घेता आली.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व ते पुढे म्हणाले, दर्यापूर येथील खारपाणपट्ट्यात शेतकऱ्यांना हमखास संरक्षित सिंचन घेऊन बागायती शेती करण्यासाठी उपयुक्त असलेले एका गावात 80 शेततळ्यांची मालिका जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या पुढाकाराने निर्माण केली आहे. आपण स्वत: दुर्बिणीतून 80 शेततळ्यांची मालिका बघितली. येणाऱ्या पावसाळ्यात या शेततळ्यात मोठ्या प्रमाणावर जलसाठे निर्माण होतील व भूगर्भात पाणी जिरेल. शेती वाचविण्यासाठी बांधबंधिस्ती महत्वाची आहे. पाणी अडविण्याबरोबर माती अडविल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढणार आहे. या उपक्रमातून जमीन तग धरते, पाणी पातळी वाढते. बांधबंधिस्तीवर अधिक भर दिल्यास परिस्थितीत निश्चित बदल होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव आदर्श गाव झाले पाहिजे. स्वच्छतेचे धडे येथे मिळाले पाहिजे. जिल्हा प्रशासनाने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यास मंजुरी देवू. या आराखड्यांतर्गत वाचनालय, स्वच्छतेचे शिक्षण देणारी संस्था एवढेच नव्हे तर स्वच्छ भारत अभियान चळवळ राबविणारी स्वतंत्र यंत्रणा सुरु करु. या भागाला जोडणाऱ्या रस्त्यालाही निधी देऊ. येत्या दोन तीन वर्षात ही कामे करुन संत गाडगेबाबांची जन्मभूमी विकसित करु, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल मा.विद्यासागर राव यांनी पुढकार घेऊन गाडगेबाबांचा पुतळा दिला त्याचे अनावरण आपण केले. राज्यपालांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. राज्याला संतांची भूमी म्हटले आहे असे सांगून, माऊली ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामापर्यंत संतांची मांदियाळी महाराष्ट्राने बघितली आहे. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच होऊ शकतो याची शिकवण संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
लोकशिक्षणाचे कार्य, गरिबी, अंधविश्वास, वंचितांची मांदियाळी, सावकारी पाशातून जोखडलेला समाज, कर्मकांडापेक्षा कर्म महत्वाचे, मानव सेवा हीच ईश्वरसेवा, ईश्वर आराधनेसाठी तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, निर्वस्त्र असणाऱ्यांना वस्त्र दिले तरच वंचितांची सेवा खऱ्या अर्थाने होईल. अनिष्ट रुढी परंपरा तोडून स्वावलंबी होण्याची मोलाची शिकवण संत गाडगेबाबांनी दिली. त्यांनी समाजाला दिशा दिली. त्यांची शिकवणच देशाला पुढे नेऊ शकेल, एवढी शक्ती गाडगेबाबांनी आपणास दिली आहे. समाजातील गरिबी, शेतकऱ्यांच्या अडचणी, कामाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संत गाडगेबाबांनी दिलेल्या शिकवणुकीच्या मार्गाने गेल्यास निश्चितपणे ग्रामोद्धार करु शकतो. आरोग्यदायी गाव करु शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील म्हणाले, संत गाडगेबाबांनी दिलेल्या शिकवणूकीनूसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे समृद्ध करण्यासाठी मागेल त्याला शेततळ्याची योजना सुरु केली. एकट्या अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कामामुळे 22 हजार हेक्टर संरंक्षित सिंचन मिळाले आहे. 253 गावात जलयुक्त अभियानाची कामे झाली असून लवकरच अमरावती जिल्हा सिंचनक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रमेश बुंदिले म्हणाले, संत गाडगेबाबांच्या तालुक्यात 50 खाटांचे रुग्णालय व्हावे. अंजनगाव सुर्जी येथे स्वच्छतेचा संदेश देणारे प्रशिक्षण केंद्र सुरु करावे. पर्यटन स्थळ म्हणून शेंडगावचा विकास व्हावा. सध्याच्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करावे. जलयुक्त अभियानाची जास्तीत जास्त कामे घ्यावीत, अशी मागणी केली. यावेळी किरण गित्ते म्हणाले, विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यात ग्रंथालय, आश्रमशाळा, संत गाडगेबाबांचे साहित्य, अन्न छत्रालय, बगीचा या सुविधा आहेत. 18 एकर मध्ये हा विकास आराखडा राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Photos