Breaking news

बालमनावर संस्कार घडविण्यासाठी कालानुरुप बदल स्वीकारत वाटचाल करा - देवेंद्र फडणवीस

मुलांच्या मासिकांच्या 90 वा वर्धापन दिन सोहळा
नागपूर(प्रतिनिधी)मुलांचे मासिक गेली नऊ दशक मूल्य संस्कार करत आहे. या मासिकाचे सातत्य वाखणण्याजोगे आहे. एक दर्जेदार मासिक कालानुरुप बदल स्विकारत वाटचाल करीत आहे. बालकांमध्ये वाचनाची गोडी टिकवितांना मूल्य संस्कार करत नव्या माध्यमातून नव्या पिढीकडे जाण्याचा प्रवास अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

आयटी पार्क परिसरातील पर्सिस्टंट सिस्टीमच्या सभागृहात मुलांचा मासिकाचा 90 वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आनंदवन येथील महारोगी समितीचे सचिव डॉ.विकास आमटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, ज्येष्ठ लेखिका व कांदबंरीकार सौ.आशा बगे, महापौर प्रवीण दटके, मुलांच्या मासिकाचे संपादक जयंत मोडक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुलांना वाचनाची आवड निर्माण करतानांच मुल्य शिक्षणाची प्रेरणा देणाऱ्या मुलांचे मासिक सातत्याने नव्वद वर्षे प्रकाशित होत असल्याबद्दल मोडक परिवाराचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुलांचा मासिकामधून राज्यातील ज्येष्ठ साहित्यिकांनी बाल साहित्याच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य बालकांसाठी उपलब्ध करुन दिली. त्यामुळेच अत्यंत दर्जेदार मासिक म्हणून ओळख निर्माण झाली. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कालानुरुप बदल स्विकारतांना वाचनाची गोडी कमी झाली आहे. वेगवेगळी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होत असले तरी वाचनाची गोडी टिकविण्यासाठी तसेच जीवनमुल्य पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, विदेशामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबांना आपली संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याची असलेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ई-बुकससह इतर माध्यमाचाही उपयोग आवश्यक असल्याचे सांगितले.

आदिवासी तसेच ग्रामीण भागापर्यंत समृद्ध बालसाहित्य पोहचविण्यासाठी दृकश्राव्य माध्यम (ऑडिओ सिडी) च्या माध्यमाचा उपयोग करावा अशी सूचना करतांना या मासिकाच्या शतकोत्तर कार्यक्रमासाठीही उपस्थित राहणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ.विकास आमटे यांनी हेमलकसा सारख्या अतिदृर्गम भागात राहणाऱ्या मुलांपर्यंत बालसाहित्य उपलब्ध होत नाही. या मुलांपर्यंत ध्वनीफितीच्या माध्यमातून मुलांचे मासिक उपलब्ध करुन दिल्यास मुलांवर चांगले संस्कारासोबत मूल्य शिक्षण पोहचविणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर प्रवीण दटके यांनी मुलांचे मासिक वाचून जीवनाची वाटचाल सुरु केल्याचे सांगतांना बालमनावर चांगले संस्कार घडविण्यासाठी महानगरपालिकेच्या 280 शाळांमध्ये मुलांचे मासिक सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र साठे सांनी बालपण हे जीवनमूल्य शिकण्याचा महत्वाचा काळ असतो. पण आज आपण मुल्य हरवत चाललो आहोत. या काळातही मुलांचे मासिक मुलांवर संस्कार जोपासत आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी बालपण कधी हरवत नाही त्यामुळेच मुलांच्या मासिकाची गोडी सर्वांनाच आहे. राज्यातील सर्व बँकांमधून मुलांच्या मासिकाचे वर्गणीदार होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ लेखिका श्रीमती आशा बगे यांनी मराठी मधील सर्व मासिके बंद होत असताना मुलांचे मासिक शतकोत्तर वाटचाल करत आहे. मुलांमध्ये आपली निरासगता व मुल्य संस्कार जिवंत ठेवण्याचे काम मुलांचे मासिक करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांच्या मासिकाचा 90 वा वर्धापन दिन सोहळ्याचे दिप प्रज्ज्वलीत करुन उद्घाटन केले. तसेच वर्धापन दिन विशेषकांचे विमोचन केले. डॉ.विकास आमटे यांच्या हस्ते इंटरनेट आवृत्तीचे तर रवींद्र साठे यांच्या हस्ते वेब साईटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुलांच्या मासिकांसाठी बालसाहित्य, चित्रकला, तांत्रिक बाबी सांभाळल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विंग कंमाडर अशोक माटे, जयंत काकडे, श्यामकांत कुलकर्णी, प्रा.सुधीर सहस्त्रबुद्धे, चंद्रकांत दीक्षित, भालचंद्र देशपांडे, अशोक शहापूरकर, विठ्ठलभाई दिसावर, दिपक सिरास यांचा समावेश आहे. मोडक परिवारातर्फे जयंत मोडक यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविकात मुलांच्या मासिकाच्या वाटचालीची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अनुया मोडक तसेच कुमारी आकांशा वैद्य, यश लिहित यांनी केले. आभार प्रशांत मोडक यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Related Photos