शिक्षण व गुणवत्ता पूर्ण शिक्षण हे विकासाचे प्राणवायू - डॉ. शांताराम मजुमदार

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर कॅम्पसचे भूमीपूजन
नागपूर(प्रतिनिधी)शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा विकासाचा प्राणवायू आहे त्यामुळे शिक्षणाचा विकास होणे म्हणजेच त्या परिसराचा सर्वांगिण विकास या उद्देशाने नागपूर येथे सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरु होत आहे. या विद्यापीठात उच्च कौशल्य आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जगाला उपयोगी ठरेल असा विद्यार्थी निर्माण करण्याचा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ.शांताराम मजुमदार यांनी केले. वाठोडा परिसरातील 75 एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंबायोसिस विद्यापीठाचे केंद्राचे भूमीपूजन डॉ. शांताराम मजुमदार यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यवस्थापनासह अभियांत्रिकी तसेच विविध स्किल डेवल्पमेंट विषयाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. देशातील तसेच विदेशातील विद्यार्थांसह नागपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा आरक्षित राहणार असून 15 टक्के प्रवेश शुल्क सवलतही मिळणार आहे.

सिंबायोसिस विद्यापीठाच्या नागपूर कॅम्पसच्या भूमीपूजन समारंभास नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिध्दार्थविनायक काणे, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ.रजनी गुप्ते, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व्यासपीठावर होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रविण दटके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, मिलिंद माने, सुधाकर कोहळे, तसेच शिक्षण, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्ये उपस्थित होते. सिंबायोसिसच्या निमित्ताने नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅम्पस निर्माण होत असून या परिसरात जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहे. व्यवस्थापन विषयातील (एमबीए) 2018 पर्यंत सुरु होईल, त्यानंतर एका वर्षात संपूर्ण परिसराचा विकास होत येथे भारतासह विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येणार आहेत. त्यामुळे नागपूरचा एजुकेशन हब म्हणून विकास होत असतातच स्मार्ट शहराकडे वाटचालीसाठी महत्वाचा टप्पा राहणार आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आवश्यक असणारे उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक आहे. तरुणांनी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरीच्या मागे न लागता, नोकऱ्या त्यांच्या मागे लागाव्यात अशा पध्दतीने अभ्यासक्रमाची रचना करण्याची आवश्यकता व्यकत करताना डॉ. शांताराम मजुमदार म्हणाले की, प्रत्येक पदवीधर हा हातोतीटी, कसोटी, सचोटी यामध्ये प्रभावी होण्यासाठी मन, मनगट आणि मेंदूचा समतोल विकास होऊन जगाला उपयोगी ठरेल असा माणूस घडविण्याचा सिंबायोसिसचा प्रयत्न राहणार आहे. भारतीय ज्ञान आणि संस्कार यांचा समावेश असलेले भारतीय विद्यापीठाचे माडेल तयार व्हावे आणि या माध्यमातून जगाला ज्ञान देणारी शिक्षण पध्दती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना भारतातील विद्यापीठ जागतिक विद्यापीठाच्या यादीत समावेश हा गौण असून भारतातील विद्यापीठाला संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रीम 20 चा प्रयोग राबविणार
-------------------------
सिंबायोसिसच्या नागपूर कॅम्पसमध्ये नागपूरसह विदर्भातील आर्थिक दृष्टया मागास असलेल्या अत्यंत 20 हुशार विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्यामध्ये भारतीय संस्कार, ज्ञान, तंत्रज्ञान व विज्ञानाची माहिती देवून जगाला व भारताला व नैतृत्व देईल असा विद्यार्थी घडविण्यात येईल असेही यावेळी कुलपती डॉ. शांताराम मजुमदार यांनी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिध्दार्थविनायक काणे, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर कॅम्पसचे भूमीपूजन सिंबायोसिसचे कुलपती डॉ.शांताराम मजुमदार यांच्या हस्ते झाले. डॉ. शांताराम मजुमदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रविण दटके यांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून गौरव केला. कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर यांनी तर आभार कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते यांनी मानले.

Related Photos