Breaking news

योग्य संधीचा अभ्यास करुन करिअर निवडा - सुरेश वांदिले

नागपूर(प्रतिनिधी)विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण निवडत असलेल्या क्षेत्रांबद्दल परिपूर्ण माहिती घेतानाच या क्षेत्रात असलेल्या संधीबद्दल या विषयाच्या अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रभावीरित्या वापर केल्यास करिअर घडविण्यासाठी यशस्वी ठरु शकतो. हा आत्मविश्वास बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकराज्य मासिकाचे संपादक तथा उपसंचालक सुरेश वांदिले यांनी व्यक्त केले.

विभागीय माहिती केंद्राच्या सभागृहात लोकराज्य मंचतर्फे लोकराज्य मासिकाच्या करिअरच्या संधी या विशेषांकाचे लोकार्पण व विद्यार्थ्यांशी संवाद या उपक्रमात श्री. वांदिले बोलत होते. माहिती संचालक राधाकृष्ण मुळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आजच्या काळात करिअर करण्यासाठी विविध क्षेत्रे उपलब्ध आहेत. परंतु या क्षेत्राबद्दल माहिती नसल्यामुळे आपण केवळ वैद्यकीय व अभियांत्रिकी या क्षेत्राकडेच विशेष लक्ष देत असल्याचे सांगताना श्री. वांदिले म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध संस्थांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमाबद्दल अनभिज्ञता दिसून येते. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये असलेल्या भरपूर संधीचा लाभ घेण्यासाठी अशा संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आपले करिअर घडवावे.
केंद्रीय नागरी सेवा व राज्य सेवा परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. परंतु त्यापैकी केवळ 2 ते 5 टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यामुळे या परीक्षेसोबतच अन्य पर्याय सुद्धा विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. बँकिंग परीक्षेसाठी मागील वर्षी सुमारे दहा लक्ष विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ सहा ते आठ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वाचन व विविध क्षेत्रांबद्दलची माहिती संकलित करण्यासाठी परिश्रमाची आवश्यकता आहे. यासाठी कठोर मेहनत करा असा हितोपदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. श्री. मुळी म्हणाले, समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम व्यक्तींची आवश्यकता आहे. यामध्ये केवळ डॉक्टर व इंजिनिअरचाच समावेश नसून ज्यांच्याकडे कौशल्य आहे तो कोणतेही क्षेत्र निवडून यशस्वी होऊ शकतो. त्यामुळेच आपली आवड ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात नैपूण्य मिळवा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना केवळ एकाच अंगाने विचार न करता त्याला पर्याय म्हणून इतर स्पर्धा परीक्षांचा पर्याय ठेवा.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित मासिक लोकराज्यचा फेब्रुवारी या महिन्याचा ‘करिअरच्या संधी’ या विशेषांकाचे लोकार्पण करण्यात आले. लोकराज्य मासिक व करिअरच्या संधी या विषयावर यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी माहिती केंद्रातील लोकराज्य मंच व स्पर्धा परिक्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासंदर्भात माहिती दिली. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती केंद्रातर्फे अभ्यासिकेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास विविध स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माहिती केंद्रात लोकराज्यचा करिअर विशेषांक उपलब्ध
-------------------------
लोकराज्यचा माहे फेब्रुवारीचा अंक करिअरच्या संधी हा विशेषांक विभागीय माहिती केंद्रात विद्यार्थ्यांसाठी व अभ्यागतासाठी विक्रीस उपलब्ध आहे. या विशेषांकामध्ये करिअर कसे निवडावे, केंद्रीय नागरी सेवा व राज्य सेवा परीक्षेची तयारी, बँकेची संधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, कृषीसह विविध क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रम यासह विविध माध्यमे यामधील करिअरच्या संधी याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. हा अंक पालक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. लोकराज्य मासिकाचा विशेषांक दहा रुपये किंमतीत माहिती केंद्रात उपलब्ध आहे.

Related Photos