
नांदेड, अनिल मादसवार| भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज केदार जगद्गुरू यांचे आध्यात्मिक समवेतच शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य आहे. यातूनच सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उभे राहिले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

शहरातील आनंदनगर भागात बांधण्यात आलेल्या श्री केदारेश्वर सत्संग भवनाचे उद्घाटन शुक्रवारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते व्हर्चूवल माध्यमातून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज केदार जगद्गुरू यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध मठाधिपतींसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, मंत्री डी. पी सावंत, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. डॉ. डी. आर. देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मीनलताई खतगावकर, मनपाचे माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, माजी महापौर जयश्री पावडे, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे, स्वच्छतादूत माधवराव शेळगावकर, शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे, लातूर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव माखणे, उद्योजक माधवराव पटणे, माधवराव एकलारे, राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे, माजी उपनगराध्यक्ष राजू शेट्टे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, बाबूराव देशमुख कवठेकर, माजी जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, माजी जि.प.सदस्य पूनम पवार, अभियंता निवृत्ती माळी, शिराढोणचे सरपंच खुशाल पांडागळे, शिवदास धर्मापूरीकर, विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज केदार जगद्गुरु यांच्या दिव्य सानिध्यात व अनेक पूजनीय मठाधिपतींच्या पवित्र उपस्थितीत श्री केदारेश्वर सत्संग भवनाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत असल्याचा मला मनःपूर्वक आनंद आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून सर्व गुरूवर्यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्याची माझी मनःस्वी इच्छा होती. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे तिथे वेळेवर पोहोचणे मला शक्य होऊ शकले नाही. त्याबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे. श्री केदार जगद्गुरु आणि श्री भीमाशंकर मठाशी आमचे जुने ऋणानुबंध आहेत.

आदरणीय डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राजकीय जीवनाची सुरूवात करताना शिराढोणच्या श्री भीमाशंकर मठात जाऊन श्री हंपय्या स्वामी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतरही ते नेहमीच श्री भीमाशंकर मठ, श्री हंपय्या स्वामी व श्री केदार जगद्गुरु यांचे मनोभावे दर्शन घेत राहिले. तोच आध्यात्मिक वारसा मलाही प्राप्त झाला. हे सौभाग्यच म्हणावे लागेल की माझ्यावर व संपूर्ण चव्हाण कुटुंबियांवर सदैव त्यांचा आशीर्वाद सदैव राहिला आहे. श्री केदार जगद्गुरु यांचे आध्यात्मिक व शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य आहे. 1972 मध्ये ते शिराढोण येथील श्री भीमाशंकर मठ संस्थान च्या गादीवर बसले. त्यांना असामान्य कर्तृत्वाचे जणू दैवी वरदान प्राप्त आहे. धार्मिक, आध्यात्मिक कार्य करतानाच शिक्षणाचे महत्व जाणून 1982 पासून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देण्यास प्रारंभ केला. गरीब व होतकरू मुलांसाठी गोपाळ चावडी येथे शाळा आणि वसतिगृह सुरू केले. यातून सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उभे राहिले असल्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

श्री केदारनाथ मंदिराचा जिर्णोद्धार असो की, त्यांचे वास्तव्य असलेल्या ऊखीमठाची पूनर्बांधणी असो, ही सर्व कामे त्यांनी तडीस नेली आहेत. आज त्यांचे वय 67 वर्ष आहे. पण तरी सुद्धा तरूणांनाही लाजवेल, असा उत्साह, तळमळ व इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे. निर्मिती, सृजनशीलता हा त्यांचा स्थायी भाव असून, त्यांनी विविध ठिकाणी उभारलेली मंदिरे, धर्मशाळांमधून त्याची प्रचिती आली आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भक्तांसाठी 135 खोल्यांचे केलेले बांधकाम असेल, श्री केदारनाथच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी मुक्कामाचे एकमेव ठिकाण असलेले ऊखीमठ येथे बांधलेली भव्य धर्मशाळा असेल, गोपाळ चावडी सिडको येथे उभारण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह व भोजनासह निवासाची व्यवस्था असेल, किंवा शिराढोण तसेच अलगरवाडी ता. चाकूर येथील भव्यदिव्य मंदिरे असतील, ही सर्व कामे त्यांच्या कार्याची प्रतिके आहेत.

भारतातल्या अनेक ठिकाणी हे निर्मितीचे कार्य त्यांच्या हातून सुरू असताना नांदेडमध्ये भव्य दिव्य सत्संग भवन असावे, अशी त्यांची इच्छा होती. माझ्यासारख्या अनेक शिष्यांना त्यांनी ही भावना बोलून दाखवली. सेवानिवृत्त अभियंता श्री निवृत्ती माळी यांनी या सत्संग भवनासाठी नांदेडच्या आनंदनगर परिसरातील आपली जागा श्री केदार जगद्गुरुंना समर्पित केली. त्यानंतर असंख्य भक्तांच्या योगदानातून ही भव्यदिव्य वास्तू आज उभी झाली, याचा मला आनंद आहे. असे अनेक समाजोपयोगी प्रकल्प व भव्यदिव्य सोहळ्यांच्या यशस्वितेसाठी अनेकांचे हातभार लागले आहेत.

श्री केदार जगद्गुरु हे माझे गुरूच आहेत. मी आयुष्यात कधीच त्यांच्याकडे राजकारणासाठी आलो नाही. त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर जे समाधान लाभते, त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही आणि त्यासाठीच मी नेहमी त्यांच्या दर्शनाला जात असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले. यावेळी माजी आ. ईश्वरराव भोसीकर,माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माधवराव पाटील शेळगावकर यांची समयोचित भाषणे झाली. स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. गोविंद नांदेडे व संतोष पांडागळे यांनी संयुक्तपणे केले तर उपस्थितांचे आभार माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी मानले. या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.
आध्यात्मिक शांती हेच मानवाचे ध्येय – खतगावकर
श्री केदार जगद्गुरु यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या सत्संग भवनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष होण्याचे भाग्य मला लाभले. आयुष्यामध्ये मी अनेक ठिकाणी कमानी उभारल्या. त्या कमानींना माझ्या आईचे नाव दिले पण हे करताना कधीच खासदार किंवा आमदार यांचा निधी वापरला नाही. आई ही जगात सर्वश्रेष्ठ असून तिच्यासाठी जे करणे शक्य आहे ते मी करतो. त्यातून मला आत्मिक समाधान लाभते. अशा कार्यातून आत्मिक शांती सोबत आध्यात्मिक शांतीकडे जाता येते. याप्रसंगी सत्संग भवनावर उभारण्यात येणाऱ्या सभागृहासाठी 21 लक्ष रुपये आपण देत आहोत, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादावर तोडगा काढावा – सावंत
भाषेचा आधार यावरून राज्य निर्मिती झाली महाराष्ट्र – कर्नाटक सिमेवर कर्नाटकात असलेल्या मराठी भाषिक गावांची महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे. यावरून गेल्या अनेक वर्षापासून वाद आहे. आपले कर्नाटकातही बहुतांश शिष्य आहेत. दोन्ही प्रदेशात स्नेह, सलोखा रहावा यासाठी आपणच पुढाकार घेत तोडगा काढावा अशी विनंती माजी मंत्री डी. पी सावंत यांनी केली आहे.
