Saturday, January 28, 2023
Home Uncategorized वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

by nandednewslive
0 comment

नागपूर| वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वन विभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वन विभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या कार्याचा गौरव आज येथे केला.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात वनविभागाच्या ‘वन भवन’ या इमारत उद्घाटन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम आणि उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोक्कड्डे, आमदार सर्वश्री आशिष जयस्वाल, देवराव होळी, माजी खासदार पद्मश्री विकास महात्मे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव आदी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, देशात नागपूरच्या ‘झिरो माईल’चे विशेष महत्त्व असून त्याच्या बाजूला वनभवनाची इमारत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असतात. ही दोन्ही चाके सुरळीतपणे चालल्यास विकास शक्य आहे. मुंबई, ठाणे या भागात अर्बन फॅारेस्ट ही संकल्पना पुढे येत आहे. त्यामुळे प्राणवायू वाढण्यास नक्कीच मदत होईल. कोविडमध्ये प्राणवायूचे महत्त्व सर्वांनाच कळले आहे. मा. प्रधानमंत्र्याच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गावर छोटी – मोठी मिळून जवळपास 35 लक्ष झाडे लावण्याचे नियोजन आहे.

banner

वन्यजीवांना धोका होऊ नये म्हणून या महामार्गावर 100 अंडरपास व ओव्हरपास तयार करण्यात आले आहे. त्यासाठी 350 कोटी रुपये अतिरिक्त खर्च केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा पर्यावरणप्रेमी, संवेदनशील आणि आत्मीयतेने काम करणारा दूरदृष्टीचा नेता मंत्रिमंडळात आपला सहकारी आहे. वन विभागात त्यांनी अतिशय तळमळीने काम केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वनभवन समाधान भवन व्हावे ही अपेक्षा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
वन आणि जीवन यांचा शब्दश: संबंध आहे. वन असेल तेथेच जीवन आहे. देशाच्या हृदयस्थानी असलेल्या ‘झिरो माईल’ येथे वनभवन उभारण्यात आले आहे. या इमारतीमध्ये 14 क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज होणार असून वनभवन हे सेवाभवन व्हावे, अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आले असता वनविभागाच्या पहिल्याच कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभली. हे आमचे सौभाग्य आहे. जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यातील 65 टक्के वाघ भारतात आढळतात. आणि विशेष म्हणजे देशात नागपूर ही टायगर कॅपिटल म्हणून ओळखली जाते. वनभवन ही इमारत जी प्लस फोर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून यावर्षी भारताला जी – 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून या परिषदेमध्ये पर्यावरण हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे नागपूर येथील जी-4 या वनभवनाच्या इमारतीमधून जी-20 ला देशाच्या पर्यावरणाविषयी योग्य माहिती मिळणार असल्याचे वनमंत्री म्हणाले.

आई आणि वनराईची सेवा ही मौल्यवान आहे. पृथ्वीच्या 456 कोटी वर्षाच्या इतिहासात अलीकडच्या 100 वर्षात सर्वाधिक उष्णता वाढली आहे. प्रदूषणामुळे मृत्यूच्या संख्येत 300 टक्के वाढ झाली असून आपल्या आरोग्याची चिंता करताना आपल्याला पृथ्वी आणि पर्यावरणाच्या आरोग्याचीसुद्धा चिंता करावी लागणार आहे. मुख्यमंत्री वने, आणि पर्यावरण याबाबत अतिशय संवेदनशील आहेत. जगात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 36 व्या क्रमांकावर आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामात महाराष्ट्र पहिल्या 10 क्रमांकात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज पुरस्कार मिळाले, त्यांनी यापेक्षाही उत्तम कार्य करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वनरक्षक रामदास खोत, प्रफुल फरतोडे, व्ही.व्ही. हलगे यांच्यासह पाच जणांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले. दीप प्रज्वलन व वृक्ष पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार नागपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी मानले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!