
नांदेड| राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदकावर स्वतःचे नाव कोरणार्या युवा होतकरु ऍथलेटीक्स खेळाडूला क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारताचे नाव उज्वल करायचे आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्याला अत्याधुनिक क्रीडा साहित्यासह अन्य क्रीडा विषयक भौतिक सोयीसुविधा अभावी आपले स्वप्न पूर्ण करताना त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे भारताच्या या भावी विश्वविजेता होण्याचे स्वप्न पाहणार्या होतकरु खेळाडूस त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी सढळ हस्ते आर्थिक मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन त्याचा सहकारी युवा खेळाडू तथा सामाजिक कार्यकर्ता लवकुश जाधव यांनी केले आहे.

निकेश धनराज राठोड हा तिवसा ता.जि. यवतमाळ येथील युवा होतकरु खेळाडू असून प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि सहकारी मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ऍथलेटीक्समध्ये आपले करिअर घडविण्यासाठी धडपडत आहे. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.जे. तृतीय वर्षात शिकत असलेल्या निकेश राठोडने खेळात वेळोवेळी मिळालेल्या संधीचे सोने करताना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर संघाचे प्रतिनिधीत्व करुन प्रथम क्रमांकासह सुवर्णपदकाला देखील गवसणी घातली असल्यामुळे आता त्याला राष्ट्रीय संघात प्रतिनिधीत्व करुन भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. परंतु घरची आर्थिक परिस्थिती पाहता त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता वाटत आहे.

निकेश धनराज राठोडला ऍथलेटीक्सची प्रचंड आवड असून त्याने राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत ८०० मि. धावणे प्रकारात सुवर्ण पदक मिळविलेले आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य ऍथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधीत्व करताना ८०० मि. धावणेमध्ये प्रथम क्रमांक, २३ व्या फेडरशेन ऍथलेटीक्स चॅम्पियनशिप पतियाळा (पंजाब) येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक, लखनो (उ.प्र.) मध्ये झालेल्या ५९ व्या सिनिअर ऍथलेटीक्स चॅम्पियन स्पर्धा (२०१९), रांची (छत्तीसगड) येथील ५९ व्या ओपन नॅशनल सिनिअर ऍथलेटीक्स चॅम्पियनशीप, २४ वी फेडरेशन कप ऍथलेटीक्स चॅम्पीयनशीप आंतरराष्ट्रीय स्पर्धा (पतियाळा, पंजाब), इंडियन ग्रँड ब्रीक्स २०२१ (पतियाळा, पंजाब) तसेच २५ व्या फेडरेशन कप ऍथलेटीक्स चॅम्पीयनशीप सिनिअर नॅशनल (कालिकत, केरळ), स्पर्धेत आपल्या क्रीडा नैपुण्याने चकमदार कामगिरीच्या जोरावर क्रीडा समिक्षकांचे ल्क्ष वेधले आहे.

राष्ट्रीय पातळीवर होणार्या विविध स्पर्धांमधून आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या निकेश धनराज राठोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करुन देशाचे नाव उज्वल करायचे आहे. परंतु त्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन, अत्याधुनिक क्रीडा साहित्यासह भौतिक सोयी- सुविधांसाठी त्याला भक्कम आर्थिक मदतीची गरज आहे.

समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निकेश राठोड (मो. नं. ७०३९१५२५१४) च्या स्वप्नपूर्तीसाठी त्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते क्रं. २०४७२०९६६२५, डइखछ ०००६३३२, उखऋ छे. ९००३३०२७३८८ वर सढळ हस्ते आर्थिक मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन युवा खेळाडू लवकुश जाधव यांनी केले असून आपली मदत निकेशच्या बँक खात्यावर पाठवावी असेही लवकुश जाधव यांनी म्हटले आहे.

