
५० खोके, एकदम ओके ही घोषणा सध्या महाराष्ट्रात फारच गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर या घोषणेचा जन्म झाला. शिंदे सरकार पदारुढ झाल्यापासून ५० खोके हा शब्द रोज कोणाच्या तरी मुखातून बाहेर पडतो. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तर एकही भाषण ५० खोक्याचा उद्धार केल्याशिवाय पूर्ण होत नाही. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात या घोषणेचे फलक झळकले आहेत. खरे म्हणजे ही घोषणा महाराष्ट्राला लाजेने माने खाली घालायला लावणारी आहे. दुर्देव असे की आजच्या राजकारणाचा समाजकारणाशी काहीही संबंध राहिला नसून राजकारण म्हणजे अर्थकारण झाले आहे. ही घोषणा त्याचेच द्योतक आहे.


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार फोडताना त्यांना ५० कोटी रुपये प्रत्येकी दिले असा या घोषणेमागे आरोप आहे. ५० खोके म्हणजे ५० कोटी रुपये. आता हा पैसा आमदारांना खरोखरच दिला की नाही याचा काही पुरावा नाही. अशा व्यवहाराचे पुरावे नसतात. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा ज्या प्रकारे लावून धरला त्यातून असा अर्थ ध्वनित होतो की, महाराष्ट्रात हे प्रथमच घडले आहे. यापूर्वी अशा रितीने (पेसे घेऊन) कधीही आमदार फुटले नाहीत. दुर्देव असे की, महाराष्ट्रात भाषण करताना सर्व पक्षाचे नेते मोठे मोठे आदर्श सांगतात. परंतु राजकारण करताना मात्र समाजकारणा ऐवजी अर्थकारणाचाच आधार घेतात. देशपातळीवरही यापूर्वी असेच आरोप झाले आहेत. नरसिंहराव यांचे सरकार वाचविण्यासाठी झामुमोच्या खासदारांना अशाच पद्धतीने विकत घेतल्याचे आरोप तेव्हा झाले.


आज शिवसेनेचे नेते सर्वाधिक ओरड करीत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे तर खोक्या व्यतिरिक्त काहीही बोलताना दिसत नाहीत. परंतु हे पहिल्यांदाच घडलेले नाही. यापूर्वी शिवसेनेत छगन भुजबळ यांच्या सोबत जे आमदार फुटले त्याही वेळी प्रत्येक आमदाराला २५-२५ लाख रुपये दिल्याची चर्चा होती. त्यावेळी महागाई कमी असल्याने खोक्या ऐवजी आमदारांचे पेटीत भागले. लाख रुपये म्हणजे एक पेटी असे मानले जाते. आता महागाई वाढल्याने पेटी ऐवजी खोके आले. छगन भुजबळ शिवसेनेतून फुटले तेव्हाही असाच गहजब माजला. आज एकनाथ शिंदे बाबत ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते बोलतात त्याच पद्धतीने छगन भुजवळ यांच्या बाबत बोलले जात होते. परंतु ती फुटही मंत्रीपदाचे आमिष आणि रोकड घेऊनच झाली.


महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी या विषयी एक किस्सा खाजगी बैठकीत आम्हाला सांगितला. भुजबळांचे बंड झाले तेव्हा प्रत्येक आमदाराला २५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. फुटणाऱ्या आमदारांना रक्कम देण्याची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली. त्यावेळचा एक ज्येष्ठ मंत्री फुटीर आमदाराकडे पैशाची बँग घेऊन गेला. त्या आमदाराने मंत्र्यांना घराच्या आंगणात उभे केले. बँग घरात नेऊन बँगेतील एक एक नोट मोजली. त्यात एक तास गेला. तो पर्यत मंत्री अंगणात उन्हात उभा होता. आमदार नोटा मोजून अंगणात आला. मंत्र्यांना म्हणाला, मी हे पैसे अगोदर गुंतवितो आणि नंतर पक्ष सोडल्याचे जाहीर करतो. आणि दुसरी गोष्ट मला वर खर्चाला अजून दोन लाख रुपये पाहिजेत. ते ऐकून मंत्र्याने कपाळाला हात लावला.

महाराष्ट्राचे दुर्देव असे आहे की, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमित केली. स्वराज्य स्थापनेनंतर रयतेच्या भाजीच्या देठाला हातही लावू नका असा आदेश त्यांनी आपल्या सैनिकांना दिला. त्यांचेच नाव घेऊन आताचे सर्वच राज्यकर्ते राज्यकारभार करतात. छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय बहुतांश नेत्यांचे भाषण सुरुच होत नाही. परंतु त्या राजांचा आदर्श प्रत्यक्ष कारभारात मात्र कोणीही घेताना दिसत नाही. भाजीच्या देठाला हात लावणे सोडा, शेतासकट भाजी कशी येईल याच फिराकीत आजचे राजकारणी दिसतात. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पन्नास खोक्याबाबत शिवसेनेचे नेते सडकून टीका करतात. परंतु एका बाबीकडे मात्र दुर्लक्ष करतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख दस्तुरखुद्द मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे सारख्या ज्येष्ठ नेत्याने बंड केले. ते बंड करणार याची साधी कुणकुणही सत्तास्थानी खुद्द पक्षप्रमुख असताना कोणालाही लागली नाही.

एकनाथ शिंदे विधान परिषदेचे मतदान आटोपून सुरतेच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी सर्व आमदार एकाच इमारतीत, एकाच ठिकाणी होते. तरीही या बंडाचा सुगावा सरकार हाती असतानाही नेतृत्वाला लागला नाही. सुरुवातीला शिंदे यांच्या सोबत केवळ १९ आमदार सुरतेला गेले. त्याचे लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर होत होते. त्यावेळी सगळ्या जगाला बंडाची माहिती मिळाली. तरीही त्यांना थांबविण्यात कोणाला यश आले नाही. शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या आमदारा व्यतिरिक्त इतर आमदार मुंबईतच होते. शिवसेनेच्या वर्तुळात वावरत होते. त्यांना विश्वासात घेऊन थांबविण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाला करता आला असता. परंतु त्यातही अपयश आले. रोज एक एक आमदार शिंदे गटाकडे जात राहिला. भुजबळ यांच्या बंडाच्या वेळी ११ आमदार फुटले. ती फुट तेथेच थांबली. त्यानंतर कोणताही आमदार फुटला नाही. परंतु शिंदेचे बंड वेगळ्याच प्रकारचे होते.

१९ आमदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाजवळ असणारा आमदार रोज फुटत होता. एक दिवस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविणारा आमदार दुसऱ्य दिवशी शिंदे गटाकडे गोहाटीला जात होता. शिवसेनेचे नेते हतबल होऊन ते पहात होते. आमदाराचे सोडा शिवसेनेचे मंत्रीही त्यात सहभागी झाले. पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेचे एक अपवाद वगळता आठ मंत्री शिंदे गटात सहभागी झाले. मंत्री पदाचा मान सन्मान, सुखसुविधा सोडून हे मंत्री शिंदे यांना जाऊन मिळाले. एखाद्या डोंगराचा रोज एक एक कडा कोसळत जाऊन डोंगरच भुईसपाट व्हावा अशी अवस्था शिवसेनेची झाली. अशी फुट यापूर्वी देशाच्या राजकारणात कधीही झाली. हे बंड राज्यापुरते आणि आमदारा पुरतेच मर्यादित राहिले नाही. आमदारानंतर खासदारांनीही मोठ्या संख्येने शिंदे गटाचा रस्ता धरला. गजानन किर्तीकरांसारखा संपूर्ण हयात शिवसेनेत घालविलेला ज्येष्ठ खासदारही जेव्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो तेव्हा अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्या शिवाय राहत नाही. एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडून निष्ठेच्या राजकारणाला तिलांजली दिली हे मान्य करावेच लागेल. परंतु त्याच बरोबर शिवसेनेतील उभी फूट टाळण्यास पक्ष नेतृत्व कमकुवत ठरले हेही मान्य केले पाहिजे. यावर कोणीच बोलत नाही.
फुटलेल्या आमदार, मंत्री आणि खासदार यांना रोज उठून गद्दार, महाराष्ट्र द्रोही अशी कितीही दुषणे द्या परंतु शिवसेनेच्या संघटन कौशल्याबाबतही एकदा आत्मचिंतन करा. कारण शिवसेनेतील हेही वास्तव लोकांना समजते. राजकारणाला नैतिक अधिष्ठान राहिले नाही तर अशा घटना घडतात. एकदा का माणसाने नैतिकला सोडली की, त्याला कशाचीही लाज वाटत नाही. आजच्या राजकारणात निष्ठेला कवडीमोल किंमत आहे. कोणत्याही पद्धतीने का होईना सत्ता माझ्या हातात राहिली पाहिजेत या विचाराने जेव्हा नेते झपाटलेले असतात तेव्हा अशा घटना घडतात. सकाळचा शपथविधी आणि एकनाथ शिंदेचे बंड हे त्याचा परिपाक आहे. आज शिवसेनेला झटका बसला, भविष्यात इतरांनाही बसणार यात शंका नाही.
विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. २० .१२.२२, मो. नं. ७०२०३८५८११