Monday, February 6, 2023
Home Uncategorized मराठवाड्यात भाजपची मुसंडी -NNL

मराठवाड्यात भाजपची मुसंडी -NNL

by nandednewslive
0 comment

मराठवाड्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडच्या पाच महिन्यांतील कामगिरीवर ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त करीत पुन्हा एकदा भाजपकडे कौल दिला आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजप मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात गाव पातळीवर आजी-माजी आमदार , खासदार व त्यांचे कार्यकर्ते उतरल्याने निवडणूक चुरशीची झाली .याबरोबरच पंचायत समिती, जिल्हा परिषद ,बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली होती. गावातील अनेक दिग्गज नेते प्रत्यक्ष रिंगणात उतरल्याने अनेक ठिकाणी अटीतटीचे सामने झाले. गाव पातळीवर राजकीय पक्षाला दुय्यम स्थान असले तरी विविध राजकीय पक्षांचे बडे पदाधिकारी आपापल्या परीने कार्यकर्ते व पदाधिकारी कसे निवडून येतील यासाठी प्रयत्नशील होते. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली ,परभणी ,लातूर, जालना, बीड , धाराशिव (उस्मानाबाद) ,छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात अत्यंत अटीतटीची निवडणूक पार पडली होती.

नांदेड जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले . मंगळवारी मतमोजणी पार पडली. भाजपने त्या ठिकाणी ९७ ग्रामपंचायतींवर विजय मिळवीत सत्तेची चावी ताब्यात घेतली. काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या नांदेड जिल्ह्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून हा जिल्हा भाजपचा असल्याचे सिद्ध केले आहे . नांदेड जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या १३९१ आहे .तर एकूण प्रभागांची संख्या ५५४ आहे. यापैकी १९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद बिनविरोध आले होते .त्यामध्ये नांदेड तालुक्यातील एकदरा ,मुदखेड तालुक्यातील वरदळा तांडा, हदगाव तालुक्यातील तालांग ,वरवंट, जांभळी , किनवट तालुक्यातील बुधवार पेठ ,शनिवार पेठ ,धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव, बिलोली तालुक्यातील टाकळी खुर्द ,मुखेड तालुक्यातील लोणाळ ,कंधार तालुक्यातील पाताळगंगा ,गांधीनगर, घुबडवाडी ,गुलाबवाडी तर लोहा तालुक्यातील वाळकेवाडी, भेंडेगाव काबेगाव ,मडकी, काजळा तांडा व मंगरूळ आधी १९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सदस्य देखील बिनविरोध आले होते. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात पळशी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ऊसतोड कामगार व मोलमजुरी करणारी राजश्री नामदेव गोटमुकले ही महिला थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा, किनवट व मुखेड तालुक्यांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळविले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील ६२ पैकी ६१ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे . हिंगोली जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ताबा मिळविला आहे. हिंगोली तालुक्यातील ईडोळी, मालवाडी, संतुक पिंपरी व राहुरी या ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकला. तर कळमनुरी तालुक्यातील येलकी, काळ्याची वाडी, ढोलक्याची वाडी, कुंभारवाडी, कांडली, पिंपरी, टाकळी कान्होबा या ग्रामपंचायती शिवसेनेला आपल्या ताब्यात ठेवता आल्या. तसेच सेनगाव तालुक्यातील पाच ग्रामपंचायती शिवसेनेला आपल्या ताब्यात ठेवता आल्या. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध वसमत तालुक्यातील चारच ग्रामपंचायत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळाल्या आहेत. तालुक्यातील हिरडगाव, कवठा, कुडाळा व बिरेगाव या चार ग्रामपंचायती शिवसेनेने काबीज केलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसने १०, राष्ट्रवादीने १२, शिवसेनेच्या शिंदे गटाने १३ जागांवर विजय मिळविला. भाजपला मात्र हिंगोली जिल्ह्यात ७ जागांवर समाधान मानावे लागले.

banner

हिंगोली जिल्ह्यातील १८५ मतदान केंद्रांवर ८२८०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या हिरडगाव येथील ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध निघाली होती. १६ सरपंच व सदस्यांच्या ४८ प्रभागातून १३० जागांसाठी ही निवडणूक पार पडली. परंतु ३३ सदस्यांच्या जागा बिनविरोध निवडण्यात आल्या होत्या. त्यामुळे रविवारी १६ सरपंच पदांसाठी ५७ तर सदस्यपदासाठी २०६ उमेदवार रिंगणात उभे होते .४८ मतदान केंद्रांवर २५० कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज होते. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या कळमनुरी तालुक्यात सोळा ग्रामपंचायतींसाठी ४८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

कळमनुरी तालुक्यातील काँग्रेसचे स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या मसोड ग्रामपंचायतीसह वाकोडी, वारंगा फाटा , बोल्डा, कांडली ,कुर्तडी ,घोडा ,जटाळवाडी, पिंपरी ,कृष्णापुर ,येलकी, कुंभारवाडी, टाकळी कानोबा, काळयाची वाडी, ढोलकाची वाडी व कोल्हावाडी या ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले . या निवडणुकीत सरपंच पदासाठी तालुक्यातील टाकळी कानोबा ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड बिनविरोध झाली. तर तालुक्यात १६ पैकी तीन ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित ओबीसी प्रवर्गाच्या जागेसाठी गावात उमेदवार उपलब्ध नसल्याने ढोलकाची वाडी, बोल्डावाडी व काळ्याची वाडी या तिन्ही ग्रामपंचायत मध्ये सरपंचपद रिक्त राहिले आहे .तर बारा गावांच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार आहे .सदस्य पदासाठी १३० पैकी २४ जागा बिनविरोध आल्या आहेत . उर्वरित १०६ जागांसाठी २१८ उमेदवार रिंगणात होते तर सरपंच पदाच्या १२ जागांसाठी ३७ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. त्याचबरोबर सेनगाव तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी देखील रविवारी मतदान पार पडले. सेनगावात सरपंच पदासाठी ३६ तर सदस्यपदासाठी १८३ उमेदवार रिंगणात होते. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १९ तर सदस्यपदासाठी १४३ उमेदवार उभे होते.

लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यांसाठी रविवारी मतदान पार पडले . त्यापैकी २३८ ग्रामपंचायतींवर भाजपने यश मिळविले आहे तर काँग्रेसला केवळ ७६ ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज करता आली. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. लातूर जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर १६ सरपंच बिनविरोध व ३९९ सदस्य बिनविरोध आले होते. लातूर तालुक्यातील ४४, रेणापूर तालुक्यातील ३३ ,औसा तालुक्यातील ६०, निलंगा तालुक्यातील ६८,शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ११ ,देवणी तालुक्यातील ८,उदगीर तालुक्यातील २६, जळकोट तालुक्यातील १३, अहमदपूर तालुक्यातील ४२, चाकूर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींसाठी चुरशीची निवडणूक पार पडली . त्यामध्ये ११४८ प्रभाग संख्या होती. ३१८५ सदस्यसंख्या आहे. लातूर जिल्ह्यातील १६ सरपंच बिनविरोध आले तर ३९९ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध आले. १०४२ उमेदवार सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात उभे होते . तर ६७८६ सदस्यांनी ही निवडणूक लढवली होती. मराठवाड्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून लातूर जिल्ह्यातील मुरुडचा समावेश आहे. या ठिकाणी भाजपच्या १७ पैकी १६ सदस्यांनी निवडणूक जिंकत ग्रामपंचायतवर ताबा मिळविला. लातूर ग्रामीणमध्ये मात्र काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

परभणी जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले . परभणी जिल्ह्यात सर्वच पक्षांनी जिल्ह्यात आपलेच वर्चस्व असल्याचे दावे – प्रतिदावे केले आहेत. दरम्यान परभणी शहरातील कल्याण मंडपम येथे मतमोजणी सुरू असताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वाद झाला. तसेच यावेळी एकमेकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामध्ये काही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये परभणी तालुक्यातील २९, गंगाखेड मधील १२, जिंतूरमधील ३३, मानवत मधील ८, पालममधील ११, पाथरीमधील ७, पूर्णा तालुक्यातील १३, सेलूमधील ११ व सोनपेठ तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. यातील केवळ ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या . १९० जन ग्रामपंचायतींचे सदस्य म्हणून निवडले गेले. परभणी जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या .ग्रामीण भागात चुरसपूर्ण लढतीवर अधिक भर देण्यात आला होता .गाव पातळीवर तडजोडीच्या राजकारणाला फारसे महत्त्व नसते. थेट एकमेकांच्या विरोधात जाऊन टोकाची भूमिका घेतली जात असल्याने बिनविरोध निवडणुकीला परभणी जिल्ह्यात महत्त्व दिले गेले नाही.

जालना जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचे दावे- प्रतिदावे केले आहेत. १४४ ग्रामपंचायतींवर जालना जिल्ह्यात भाजपने यश मिळविले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ७३ ग्रामपंचायती जालना जिल्ह्यात मिळालेल्या आहेत . एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेला ८५ जागांवर विजय मिळविता आला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने १०१ ग्रामपंचायती ताब्यात घेतलेल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात केवळ ५७ ग्रामपंचायती काँग्रेसला स्वतःकडे ठेवता आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील ६७१ ग्रामपंचायतींचा निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल महाविकास आघाडीला यश देणारा ठरला आहे. बीड, गेवराई, वडवणी, केज ,अंबाजोगाई तालुक्यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळाले आहे . बीड जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. अंबाजोगाई ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसला.

बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी निवडणूक झालेल्या ६६३ गावातील ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना ग्रामस्थांनी धक्के देत तरुणांना संधी दिली. राजकीय नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील ताकद कायम ठेवली. बीड जिल्ह्यातील ४७ गावांच्या सरपंचांची निवड बिनविरोध झाली . घोषित झालेल्या ५९६६ सदस्यांपैकी ६६६ सदस्यांच्या निवडीही बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष ६६३ गावांमध्ये ६५६ सरपंच पदासाठी व ५२९५ सदस्यांच्या निवडीसाठी मतदान झाले होते. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे घटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर ताबा मिळविला तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना मोठ्या गावात सत्तांतर करण्यात यश आले. बीड मतदार संघात भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दिसून आले.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजपने चांगलीच आघाडी घेतली. या जिल्ह्यात महाविकास आघाडीला देखील चांगलेच यश मिळाले आहे. तुळजापूर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर ४८ पैकी २५ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने यश मिळविले आहे. कळंब तालुक्यातील ८ ग्रामपंचायती शिवसेनेकडे ठेवण्यात उद्धव ठाकरे गटाला यश आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप – शिंदे गटाचे २१६ पैकी १५८ सरपंच निवडून आल्याने या जिल्ह्यातही भाजपने मुसंडी मारली आहे. या जिल्ह्यात महाविकास आघाडीला केवळ ९८ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविता आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१९ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता त्यामधील गंगापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या चुकीच्या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. उर्वरित २१६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यातील १४ गावांमधील सरपंच आणि ३०८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित २०२ सरपंच पदासाठी ६१४ आणि सदस्य पदासाठी ६३९० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार तसेच पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आपापले गड शाबूत राखले आहेत.

लेखन,,,,अभयकुमार दांडगे, नांदेड, मराठवाडा वार्तापत्र, ९४२२१७२५५२ abhaydandage@gmail.com

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!