श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। निसर्गाची असीम कृपा लाभलेल्या माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या घंनदाट जंगलात बिबट, अस्वल,रोही,हरीण, कोल्हा रानडुक्कर आदी प्रकारचे प्राणी मुक्त संचार करतात. कधी-कधी पाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी मानवी वस्तीत भटकंती करताना दिसल्याच्या चर्चा नियमितपणे ऐकायला मिळतात.त्यामुळे जंगल भाग व परीसरात वन्य प्राण्यांच्या शिकारी होऊ नये म्हणून शासनाकडून कठोर कायदे करण्यात आले आहेत. तरीही चोरून लपून काही घटना घडत असतात.
दि.२१ डिसें.रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे त्यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांसह आष्टा ता,माहूर गावात धाव घेतली. तिथे रानडुक्कराच्या दाताचा जबडा, पायाचे तीन तुकडे, शिजवलेले मांस, कच्च्या मासाचे तुकडे, दोन सुरी,मोजमाप तराजू, एक दुचाकी असा मुद्देमाल आढळून आला.पंचनामा केल्यानंतर त्यांनी रमेश भावसिंग राठोड (३९), आणि माणिक बाबाराव पेंदोर (४०) या आरोपींना ताब्यात घेतले.
उपवनसंरक्षक केशव बाबळे,साहाय्यक वन संरक्षक जी.डी.गिरी यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी घटनास्थळ गाठले असता आरोपींनी पळ काढला. वन परिक्षेत्र अधिकारी जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन किमी अंतरावर पाठलाग करून तुरीच्या शेतातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुध्द वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९,३९,५० व ५१ ( १) प्र.गु.री. क्र०५ / २०२२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.२२ डिसेंबर रोजी न्यायालयाला पुढे उभे केले असता,न्यायालयाने दोघानाही एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत वनपाल मीर साजिद अली, वनरक्षक बि. डी. गुसींगे, डी. व्ही. मळेकर, ए. जी. गेडाम, माधव डाके,एस. एस. भुरके, सुरज चव्हाण, वाहन चालक कृष्णा कर्डेकर यांचा सहभाग होता.माहूर तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की,वन्य प्राण्यांची शिकार करणे, शिकार केलेल्या प्राण्याच्या मांसाची खरेदी करणे गुन्हा असून तशी कृती केल्यास तीन ते सात वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंड अशी वन कायद्यात तरतूद असल्याने कुणीही वन्य प्राण्यांची शिकार करू नये असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव यांनी केले आहे.