उस्माननगर, माणिक भिसे। आलेगाव ता.कंधार येथील प्रगतशिल शेतकरी प्रशांत शंकरराव पाटील मोरे यांनी त्यांच्या शेतात प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक / नाविन्यपूर्ण पध्दतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल २०२२- २०२३ चा डॉ.शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय , कर्तव्यदक्ष आ.श्यामसुंदर शिंदे , सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सदरील कृषि प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन 22 डिसेंबर 2022 रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेट्टे, महाराष्ट्र शासनाचे कृषि भुषण प्राप्त शेतकरी डॉ.शिवाजी शिंदे, आत्मा प्रकल्प उपसंचालक श्रीमती सोनवणे, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) श्रीमती भाग्यश्री भोसले, मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर, जिल्हा कृषि अधिकारी व्ही.एस. निरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले. यामध्ये शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2021-22 चे 16 व 2022-23 चे 16 असे एकूण 32 शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह, साडीचोळी, शाल, फेटा व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.
जिल्हयातील शेतकरी, कृषि निविष्ठा कंपनीचे प्रतिनिधी स्टॉलधारक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी कृषि विभागामार्फत आयोजित फळे, भाजीपाला, मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या गुणवत्ता पुर्ण पिकांच्या नमुन्याचे पाहणी करुन शेतकऱ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद कृषि विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला, मसाला पिकांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध पिकांच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषीनिष्ठा शेतकरी प्रशांत मोरे यांच्यासह सहपत्नीक सत्कार करून गौरव करण्यात आला.शेतकरी प्रशांत मोरे यांनी कृषी प्रदर्शनात भाग घेऊन त्यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या पिकांची नमुने कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
त्यामध्ये सिमान्स सीड्स कंपनीचे टरबूज वान टायगर,काकडी, टोमॅटो,वाहन बाहुबली हळद हे पिक ठेवून कृषी प्रदर्शनात सहभागी झाले होते.
प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांनी केले तर सुत्रसंचालन राम कवडे यांनी केले. आभार कृषि अधिकारी सिकंदर पठाण यांनी मानले. हे प्रदर्शन आयोजनासाठी जिल्हा कृषि अधिकारी व्ही.एस. निरडे, पुंडलिक माने, माजी जिल्हा कृषि विकास अधिकारी संभाजी कऱ्हाळे, मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर यांनी सहाय्य केले.आलेगाव येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत शंकरराव पाटील मोरे यांना डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील सरपंच , प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी यांनी अभिनंदन केले आहे.