नांदेड,रविंद्रसिंघ मोदी। शनिवारी येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड आणि सिल्वर कप हॉकी स्पर्धेला खेळाची खरी रंगत चढल्याची प्रचिती आली. आजचे पाच पैकी चार सामने अटितटीचे झाले. आणि एका सामन्यात गोलांचा पाऊस पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फिटली म्हणावे लागेल. आज कस्टम मुंबई, सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली, एक्सेलेंसी हॉकी अकैडमी पुणे, पंजाब पोलीस जालंधर आणि ईएमई जालंधर संघांनी त्यांचे सामने जिंकले.
आजचा पहिला सामना कस्टम मुंबई आणि आर्टलेरी सेंटर सिकंदराबाद संघात खेळण्यात आला. संघर्षपूर्ण अशा सामन्यात कस्टम मुंबई संघाने 2 विरुद्ध 1 गोल फरकाने सिकंदराबाद संघाला नमवले.सिकंदराबाद संघाने खेळाच्या 12 व्या मिनिटाला मल्हारी चव्हाण याच्या मैदानी गोलाने आघाडी घेतली खरी पण खेळाच्या 37 व्या मिनिटाला मुंबईच्या शशि सूरज याने गोल करत सामना बरोबरीत आणला. दोन्ही संघानी ताबलतोड हल्ले चढवले.
44 व्या मिनिटाला कस्टम मुंबई संघाने केंची वेंकटेश याच्या मैदानी गोलाने संघाला आघाडी मिळवून दिली आणि शेवट पर्यंत आघाडी टिकवत कस्टम मुंबईने विजय साजरा केला. आजचा दूसरा सामना सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली आणि पीएसपीएल पटिआला संघादरम्यान खेळवला गेला. दोन्ही बलाढ्य संघ असल्याने प्रेक्षकांनी मोठा उत्साह व्यक्त केला पण दिल्ली पोलिसांनी दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करत 3 विरुद्ध 0 गोलाने वरील सामना खिश्यात घातला. दिल्ली तर्फे मोहम्मद वसीउल्लाह खान यांने दोन मैदानी गोल केले. तर कौशल यादव याने आज देखील संघासाठी सुरेख गोल केला. पटियाला संघाने अनेक संधी गमावल्या आणि सामन्यात त्यांना परत येता आले नाही.
आजचा तीसरा सामना एक्सेलेंसी हॉकी अकाडेमी पुणे विरुद्ध सुफियान हॉकी क्लब अमरावती संघा दरम्यान खेळला गेला. दोन्ही संघांनी बहारदार खेळाचे प्रदर्शन केले. सुरुवातीच्या 13 व्या मिनिटाला पुणे संघाच्या रोमेश पिल्ले याने मैदानी गोल करत आघाडी मिळवून दिली. पुढे सतत 46 मिनिटं दोन्ही संघात गोल करण्यासाठी संघर्षपूर्ण खेळाचे कौशल्य पणास लावले. आणि शेवटच्या मिनिटाला पुण्याच्या स्टेफन स्वामीने गोल करून विजय निश्चित करून टाकले. आजचा चौथा सामना एकतर्फा झाला म्हंटल्यास वावगं होणार नाही.
पंजाब पोलीस जालंधर आणि चार साहेबजादे हॉकी अकाडेमी नांदेड संघात हा सामना खेळला गेला. पंजाब पोलीस संघाने 7 गोलांचा पाऊस पाडत चार साहेबजादे संघाचा दारुण पराभव केला. नांदेडचा संघ गोल करू शकला नाही. पंजाब पोलीस संघातर्फे खेळाच्या तिसऱ्या मिनिटाला करणबीर सिंघ याने गोल केला व नंतर पुढे त्याने 27 व्या मिनिटाला दूसरे गोल केले. या शिवाय हरदीपसिंघ सहाबी याने दोन गोल, वरिंदरसिंघ, बलजीतसिंघ, पवनदीप सिंघ यांनी गोल केले.
आजचा शेवटचा सामना ईएमई जालंधर संघ विरुद्ध खालसा यूथ क्लब नांदेड संघात खेळला गेला. दोन्ही संघानी चुरशीचा खेळ दाखवला पण जालंधर संघाने 45 व्या मिनिटाला एकमात्र गोल करून कसेबसे विजयी स्थान टिकवून ठेवले. नांदेड संघ विजयी व्हावा यासाठी प्रेक्षकांनी मोठा उत्साह प्रकट केला. पण नशिबाने जालंधर संघाला साथ दिली. टूर्नामेंट कमेटीचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब यांनी खेळाडूंना चांगले खेळ दाखविल्याबद्दल प्रशंसा केली.