Saturday, June 3, 2023
Home Uncategorized तरच नदीचे काठ समृद्ध होतील -NNL

तरच नदीचे काठ समृद्ध होतील -NNL

by nandednewslive
0 comment

अनंत सुख-दु:खाच्या प्रवाहाला घेऊन नदी गावाच्या काठाला कवेत घेत तर कुठे वळसा घेऊन दुसऱ्या गावच्या सीमेकडे मार्गस्थ होते. नदी ही अल्लड असते. नदी खोडकर असते. नदी जीवनदायी असते. नदी पिढ्यान पिढ्याच्या लोककथा व आठवणी घेऊन असते. नदी एक जीवन असते. नदी आस्थेचा संगमही असते. नदी आणि नदीचा काठ कधी-कधी पंचमहाभूतील जीवनअंश समावून घेत मोक्षही देणारी असते. नदी प्रत्येक व्यक्तीच्या बालपणातील आठवणींचा कल्लोळ असते. आपले पूर्वज शिक्यात जशी भाकरी जपून ठेवायचे तसेच बालपणातील आठवणी जपून ठेवण्यासाठी नदी ही प्रत्येकाच्या आठवणीतील शिकेही असते.

पूर्वी नदीच्या काठावर कुठे धुराचे लोट दिसले तर मनात शंका-कुशंकांना जाग यायची. नदीच्या काठावरचा धूर हा मोक्षाशी जुळलेला ! तिच्या प्रवाहातील उथळ जागांवर चालतांना गावकुसातली शिवाराप्रमाणे मऊसुद रेती प्रत्येकांच्या पावलांसाठी असायची. जिथून कुठे ती प्रवाहित झाली असेत त्या मार्गावर चालतांना कधी कुणाच्या पायाला काही रुतले असण्याची शक्यता नसायची. नदी आमचीच धरोहर आहे ही भावना प्रत्येकांच्या मनात असायची. तिचे एका अर्थाने हे मातृत्व प्रेमाचे द्योतक होते. वाळूचा रंगही तिच्या धरोहराशी मिळता-जुळता. ती ज्या डोंगर-पठारावरुन पुढे सरकायची तिथल्या डोंगर-पठाराचा, पाषानाचा रंग रेतीत यायचा.

आस्थेचा काठ होती नदी. केवळ कर्मकांडापुरता संदर्भ मर्यादित नव्हता नदीचा. श्रद्धेच्यापलीकडे एक आपलेपणाची भावना जपणारी पुर्वीची आपलीच पिढी होती. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे व नदीप्रती जपलेल्या आस्थेच्या शिकवणुकीमुळे आपल्या पिढी पर्यंत नदी प्रवाहीत होतांना आपण पाहू शकतो हे लक्षात घ्यावे लागेल. माझी नदी, माझ्या गावची नदी एवढा आपलेपणा प्रत्येकाच्या मनात पूर्वी रुजलेला होता. नदी ही निर्मळ ठेवली पाहिजे ही भावना प्रत्येकाची होती.

अलिकडच्या काळात नदीला केवळ घाटाच्या स्वरुपात बंदीस्त करून आपण आपल्या कर्तव्याचे भान सोडून दिले की काय अशी स्थिती आहे. कुठली तरी एक यंत्रणा येईल, ती यंत्रणा माझ्या गावच्या नदीचे स्वामित्व घेईल आणि तेच माझ्या गावच्या नदीची काळजी वाहतील अशी भावना दृढ झालेली आहे. महानगरात राहणाऱ्या लोकांनी आपले सांडपाणी शक्य तेवढे शोच खड्डा करून जमिनीत मुरविण्याला प्राधान्य दिलेले क्वचित आढळते. घरातला साधा कचरा ओला व सुका अशी वर्गवारी आपण करतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.

ओल्यासह प्लॉस्टिकच्या कचऱ्यापर्यंत सारे काही आपण नदीला जाऊन मिळणाऱ्या नाल्यांच्या प्रवाहात बिनदिक्कत सोडून देणाऱ्यापैकी आहोत का ? नदीच्या आरोग्याला घातक ठरणारे जेवढे काही रासायनिक घटक मिळतात ते नेमके येतात कुठून ? साबण, सर्फ ते टॉयलेट स्वच्छतेसाठी वापरले जाणारे रसायन पाण्यावाटे पुन्हा नदीलाच मिळणार ना ! या रासायनीक घातक रसायनापासून ते प्लास्टिक कॅरीबॅगच्या बेपर्वा वापर करणाऱ्या आपल्या मानसिकतेत व वर्तणात बदल करण्याकरीता एखादी शासकीय योजनाच आवश्यक असते का ? अनंत प्रश्न आहेत.

आपण ज्या भवतालात राहतो तो भवताल आपण स्वच्छ न ठेवता कुठल्यातरी यंत्रणेने येऊन तो स्वच्छ ठेवला पाहिजे अशी एक धारणा आपली आहे. एक नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या वर्तणात आपल्या भवतालाला बदलण्याचे सामर्थ्य आहे हेच आपण विसरलो की काय अशी स्थिती आहे. भवताल पासून ते पर्यावरणापर्यंत, पर्यावरणापासून ते नदीपर्यंत एक व्यापक जनजागृतीची आवश्यकता निर्माण झाली आहे.

यादृष्टिने शासनाने “चला जाणु या नदीला” हा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम शासकीय योजनेच्या पलिकडे लोकसहभागाला अधिक महत्व देऊन प्रत्येकाच्या कर्तव्याला आवाहन करणारा आहे. माझ्या गावची नदी मला समजून घेता आली पाहिजे. नदीचे आरोग्य नेमके कसे आहे हे प्रत्येकाने फिरून पाहिले पाहिजे, यासाठी हे अभियान आहे. तिचे आरोग्य म्हणजेच माझे आरोग्य आहे ही समज अधिक दृढ झाली पाहिजे. असे जर झाले तर प्रत्येकाला आपुलकीच्या नात्याने, आपल्या गावासाठी, आपल्या नदीसाठी शक्य तसे योगदान देण्याची कर्तव्य भावना वाढीस लागेल.

या दशकात विशेषत: गावोगावी पाणी प्रश्नाप्रती, नद्यांप्रती, लहान-मोठ्या नदी-नाले, ओढ्याप्रती एक व्यापक जनजागृती निर्माण झाली आहे. अनेक गावेच्या गावे श्रमदानाच्या माध्यमातून परिवर्तनासाठी सज्ज झाली आहेत. जलयुक्त शिवार योजने सारख्या चळवळीला अनेक गावांनी आपल्या लोकसहभागातून एक नवीन विश्वास जागविला आहे. याचबरोबर पाणी फाउंडेशन व इतर अनेक उद्योग समुहांनी सामाजिक उत्तरदायीत्वाच्या माध्यमातून अनेक गावात चांगली कामे झाली आहेत.

अनेक गावांनी नदी आणि पाण्याप्रती आपली कर्तव्य भावना श्रमाच्या माध्यमातून समृद्ध केली. श्रमाचे दान हे पवित्र दान असते याची अनुभती प्रत्येकाने घेतली आहे. लहान मुलांपासून थोरांपर्यंत यात सर्वांनी सहभाग घेतला. महिलांचे योगदान लक्षणीय राहिले. “चला जाणुया नदीला” ही अभिनव चळवळ याच कर्तव्य तत्परतेच्या संकल्पाला दृढ करणारी योजना आहे. प्रत्येक गावातील लहान, थोरांनी यासाठी लोकसहभागाचा प्रत्यय दिल्यास आपले भवताल समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.

– विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!