
नांदेड। लक्ष्मीनारायण नगर, तरोडा बु. येथील वृत्तपत्र विक्रेता भवानजी दत्तराव पवार हे नांदेड ते पुणे सायकल ने प्रवास करून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक व समाधी दर्शन व अभिवादन वढू बु, भीमा कोरेगाव येथील वीर विजयस्तंभ, सिहगड किल्ला येथे भेटी देऊन शुरवीरांना अभिवादन करणार आहेत. त्यांची ही यात्रा कुठल्या देवाचा नवस पूर्ण करण्यासाठीची नसून महाराष्ट्रातील इतिहासात शहीद झालेल्या विरांना अभिवादन करण्यासाठी व मराठा आणि आंबेडकरवादी समाजात जातीभेदाची दरी निर्माण करणाऱ्या विचारसरणीला त्यांचा कान पिळून चपराक मारण्यासाठी काढलेली समता यात्रा आहे.

यात्रेला जाताना विविध ठिकाणी मुक्काम करावे लागणार आहे त्यामुळे भवानजी पवारला शिवप्रेमी व भिमप्रेमी यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. भवानी पवार हे लहानपणापासून वृत्तपत्र वितरणाचे काम करतात. त्यातूनच सायकल चालवण्याची आवड निर्माण झाली आहे. ते दिवसभर सायकल वर काम करून प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करतात. सोबत आवळा ज्यूस व रसवंती गृह तरोडा बु भागात चालवतात. त्यांची लहानपणापासून मेहनत करण्याची तयारी जिद्द आहे.

भवानजी पवार यांनी महिन्यांपासून या दौऱ्याची तयारी केली आहे. याअगोदर बोल्डा, कंधारचा भुईकोट किल्ला, व शहरात दररोज तयारी करून या प्रवासास आज सकाळी दहा वाजता केली आहे. भवानजी पवार हे लक्ष्मीनारायण नगर तरोडा बु, नांदेड येथून निघून पाथरी, बीड, अहमदनगर मार्गाने पुणें येथील सिंहगड या ऐतिहासिक किल्ल्यांला भेट देतील, तेथे छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांना अभिवादन करून , वढू बु छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी दर्शन घेऊन अभिनंदन करतील तसेच भिमा कोरेगाव येथील विर विजयीस्तंभ येथे विरांना अभिनंदन करून परत नांदेडलच्या प्रवासाला लागतील.

भवानजी पवार यांच्या या सायकल वरील समता यात्रेच्या प्रवासाला सकाळी दहा वाजता शुभेच्छा देतांना वार्ड क्रं. दोनचे नगरसेवक प्रतिनिधी मनिष कदम, तरोडा बु. येथील माणिक देशमुख, अविनाश जोंधळे, पद्माकर पवार, अमोल जोंधळे, पवळे सर, सुरेश सावते, धनंजय उमरीकर, दिपक सोनुले, विनय पंडित, गजानन पवार, साई भवानजी पवार आदीसह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भवानजी पवार यांना महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनेही कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी प्रवास सुखकर होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

