
श्रीक्षेत्र माळेगाव मीडिया सेंटर| माळेगाव यात्रेचे विशेष वैशिष्ट्य ठरणारी कुस्त्यांची दंगल माळेगावात मोठ्या प्रमाणात झाली. राज्यातून विविध विभागातून आलेल्या मल्लांनी आपले बळ अजमावले. काही जणांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

अत्यंत चुरशीच्या दंगलीत मल्लांच्या ताकतीचा कस लागत होता. घेण्यात आलेल्या कुस्ती दंगलीत प्रथम क्रमांकाची कुस्ती लोहा तालुक्यातील किवळा येथील मल्ल अच्युत टरके यांनी जिंकत माळेगाव केशरीचा बहुमान पटकावला. सलग तीन वर्षे त्याने माळेगाव येथील कुस्ती जिंकली आहे. मानाचा फेटा, चांदीचा गदा व 31 हजार रोख रक्कम देण्यात आली.

ज्ञानेश्वर वडगीर (हिंगोल) हा उपविजेता ठरला. यास 15 हजार रुपयाचे बक्षीस त्याला देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे 15 हजारचे बक्षीस श्याम पवार (रामतीर्थ), तृतीय बक्षीस दिलीप बामणीकर व अबू चाऊस यांना विभागून देण्यात आली. दोघांनाही अकरा हजारार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

माळेगावात वाढली गर्दी; बच्चे कंपनीने लुटला यात्रेचा आनंद

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा सुरू होऊन चौथा दिवस झाला आहे. आज चौथ्या दिवशी रविवार असल्याने यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. नांदेड, परभणी, हिंगोले, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हा, मराठवाडा तसेच पर राज्यातून नागरिक यात्रेत दाखल झाले आहेत. रविवार सुट्टी असल्याने कर्मचारी व बच्चे कंपनीची गर्दी माळेगावात दिसून आली. सुमारे आठ ते दहा लाखाची गर्दी होती. अकलूजच्या धर्तीवर लावणी महोत्सव रविवारीच ठेवल्यामुळेही माळेगावात गर्दी वाढली होती.

