श्रीक्षेत्र माळेगाव मीडिया सेंटर| बंजारा समाजाची परंपरागत वेशभूषा कला व विणकाम साहित्य माळेगाव यात्रेत विक्रीसाठी आले आहे.
बाबी तांडा तालुका वडवणी जिल्हा बीड येथून जमा राठोड आणि त्यांच्या पत्नी येल्लमाबाई राठोड यांनी पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या बंजारा समाजातील वेशभूषाचे साहित्य माळेगावात विक्रीसाठी आणले आहे. यामध्ये बबलू (लग्नावर व पारंपरिक खेळामध्ये वापरल्या जाणारे) कमरेची पिशवी, निवद धाळणी (निवद थाळी) कुल्या, पारंपरिक घागरा, ओढणी, कंबरपट्टा, घुंगट, कसोट्या (कमरेला लावण्यासाठी) देवाची कोतळी, शेला, तितरी, अशा अनेक पारंपारिक वस्तू विक्रीसाठी माळेगावात आणल्या आहेत. गेल्या पाच वर्षापासून ही परंपरा टिकवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी या वस्तू विक्रीसाठी नेत आहेत. पहिल्यांदाच ते माळेगावात आले आहेत.
दोन दिवस उशिराच आलो परंतु या भागात आनेक बंजारा समाजाचे लोक आहेत. ते स्टॉलला भेट देऊन वस्तू खरेदी करत आहेत, असे राठोड यांनी सांगितले. आता आधुनिक काळात शिक्षण आणि नोकरीमुळे पारंपारिक वेशभूषा कमी होत चालली आहे. परंतु ही परंपरा टिकून राहावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर-उत्सव, लग्न सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने बंजारा पोशाख घातला जातो, असेही त्यांनी सांगितले.