नांदेड। मिशन मोडमध्ये एखादे काम सातत्य ठेऊन करणे अत्यंत जिकिरीचे असते. पण हे अवघड काम 32 वर्षांपासून वि.मा. काकडे गुरुजी सातत्यपूर्ण करतात. प्रतिवर्षी माळेगाव यात्रेत वि.मा. काकडे हे सेवानिवृत्त शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी भरवतात. त्यांच्या प्रदर्शनीस यावर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषदेच्यावतीने माळेगाव यात्रेत विविध स्टॉल्स लावले जातात. त्यापैकी शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी भरवली जाते.यात शिक्षण विभागाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी याची माहिती असलेले पोस्टर्स, फोल्डर्स , होर्डींग्स लावले जातात. मात्र यातील एक कोपरा आपले लक्ष वेधून घेतो. लोहा तालुक्यातील वि.मा. काकडे गुरुजी हे सेवावृत्ती शिक्षक 1990 पासून सातत्याने स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य तयार करून या यात्रेतील प्रदर्शनीत ते मांडतात. या शैक्षणिक साहित्यात भाषा, गणित, अध्ययन -अध्यापनाच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांना सुलभ अध्ययन करता येईल या पद्धतीचे शैक्षणिक साहित्य मांडलेले असते.
परिसरातील शिक्षक या प्रदर्शनीस भेट देतात. विद्यार्थीही भेट देतात आणि गुरुजींचा नवीन प्रयोग आवर्जून पाहतात. विद्यार्थ्यांसाठी क्वीज घेतात. त्यांना रोख पारितोषिके देतात. गेली 32 वर्ष सातत्याने कुठलाही खंड न पडू देता ते प्रदर्शनीत सहभागी होतात. या संदर्भात त्यांनी शिक्षण हे व्रत म्हणून मी स्वीकारले असून आयुष्यभर शिक्षण सेवा करणे हेच उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी म्हटले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी स्वातंत्र्यवीरांची यशोगाथा असलेली चित्रमय प्रदर्शनी यावेळी मांडली होती ती लक्षवेधी ठरली. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गट शिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, नंदलाल लोकडे आदींनी त्याचे कौतुक केले.