नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरुगोविंद सिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्यावतीने घेण्यात आलेल्या ”चार साहेबजादों का बलिदान: एक अद्वितीय मिसाल” या विषयावरील निबंध स्पर्धेचा निकाल गुरुवारी दि. २९ जाहीर करण्यात आला. या निबंध स्पर्धेत अर्जापूरच्या पानसरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री संग्राम मंडगे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
वीर बाल दिवसाचे औचित्य साधून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरुगोविंद सिंघजी यांच्या जयंतीनिमित्त या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या पानसरे महाविद्यालयाच्या गायत्री संग्राम मंडगे यांना पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पुरस्कार नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयातील अनिताकौर प्रीतमसिंग कामठेकर यांना तीन हजार रुपये आणि प्रमाणपत्र आणि पानसरे महाविद्यालयातील प्रणिता गंगाधर पटवेकर या विद्यार्थिनीस दोन हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या निबंध स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक भोकरच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील काजल काशिनाथ पल्लेवाड आणि सहयोग कॅम्पसमधील पुष्पिंदरकौर संधू यांना देण्यात आले.
विद्यापीठातील श्री गुरुगोविंद सिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्रात श्री गुरुगोविंद सिंघजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील श्री गुरुगोविंद सिंघजी अध्यासन संकुल हे राष्ट्र पातळीवर सर्वात अग्रेसर असेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विजेत्या स्पर्धकांनी वीर बाल दिवसाच्या निमित्ताने लिहिलेले निबंध आणि श्री गुरुगोविंद सिंगजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी अध्यक्ष लड्डूसिंघ महाजन यांनीही यावेळी समयोचित भाषण केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक श्रीरामे, संकुलाच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. निरंजनकौर सरदार, गुरू बचनसिंघ शिलेदार, इंद्रजीतसिंघ संधू, रणबीरसिंघ रामगडीया, अधिसभा सदस्य डॉ. शालिनी कदम, डॉ. बी. एस. सुरवसे, शंकरराव चव्हाण अध्यासन संकुलाचे संचालक डॉ. अर्जुन भोसले, विद्यापीठाचे अभियंता तानाजी हुसेकर, डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. आर. जे. गायकवाड, डॉ. ममता इंगोले, अध्यासन संकुलाचे संचालक प्रो. डॉ. दीपक शिंदे, माध्यमशास्त्र संकुलातील प्रो. डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलास यादव, प्रा. प्रीतम लोणेकर, प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, प्रा. गिरीश जोंधळे, शुभम नर्तावार यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिका बोरा यांनी तर मोनिका तिडके हिने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.