
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। नांदेड जिल्ह्यातील नायगांव महामार्गावर कुंटूर फाट्याजवळ टाकळगाव फाटा देगाव येथे गंगमवार सावकार लोहगावकर यांनी थेट शेती माल खरेदी केंद्राच्या ठिकाणी २ ते आडीच हजार ब्रास मुरुमाचा वापर केला असून. सध्या मुरुम उत्खननाला परवानगी नसतांना मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे नोंद करण्यात यावे अशी मागणी गणेश कंदुर्के यांनी केली आहे.

गौण खनिजाच्या उत्खननाला कुठलीच परवानगी नसतांना नायगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध उत्खनन करुन नियमबाह्य वाहतूक होत आहे. तालुक्यातील अनेक गावात अशा प्रकारे मुरुमाचे उत्खनन होत असतांना महसूल विभाग बघ्याची भुमिका घेत आहे. चोरीच्या मार्गाने होत असलेल्या अवैध उत्खननामुळे अधिकारी आणि माफीया अर्थिक द्रष्ट्या संपन्न होत असले तरी शासनाचे लाखो रुपये नुकसान होत आहे पण याचे कुणालाही सोयरसुतक नाही हे विशेष.

नांदेड – नायगांव महामार्गावर कुंटूर फाट्याजवळ टाकळगाव फाटा देगाव येथे गंगमवार सावकार लोहगावकर यांनी थेट शेती माल खरेदी केंद्र सुरु केले असून. या ठिकाणी त्यांनी एक गोडावून बांधकाम करत आहेत. यासाठी हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करुन वापर करण्यात आला आहे. महामार्गाच्या बाजूलाच बांधकाम होत असलेल्या ठिकाणी हजारो ब्रास मुरुमाचा वापर करण्यात आल्याचे दररोज ये जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसत असते पण ते कानाडोळा करत आहेत.

गौण खनिज उत्खननाची परवानगी नसतांना येथे कुणाच्या परवानगीने मुरुम टाकण्यात येत आहे याचा तपास लावण्यासाठी जागेवर जावून पंचनामा करुन संबधीतावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व ज्या ठिकाणी अवैध मुरुमाचे उत्खनन करण्यात आले त्या ठिकाणची ईटीएस मोजणी करण्यात यावी अशी मागणी गणेश कंदुर्के यांनी तहसीलदार गजानन शिंदे यांचेकडे केली आहे.

